शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई चांदगुडे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यांच्या विरोधात कोणताही उमेदवार निवडणूक रिंगणात न राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आज अधिकृतरित्या बिनविरोध निवडीची घोषणा झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवक कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांनी फटाके फोडून, पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत आनंद साजरा केला.

सुप्रियाताई चांदगुडे यांनी या विश्वासाबद्दल मतदारांचे, पक्ष नेतृत्वाचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. “प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष उपक्रम राबवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन,” असे त्यांनी सांगितले.
भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे हे यश असल्याचे मत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. प्रभागातील एकजूट, नियोजनबद्ध तयारी आणि नागरिकांचा वाढता पाठिंबा यामुळेच ही बिनविरोध निवड शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
या निवडीमुळे प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून आगामी काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


