spot_img
spot_img
spot_img

रहाटणी प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादीचा रणनीतीपूर्ण डाव; तरुण, नव्या चेहऱ्यांवर विश्वास ठेवत भाजपच्या पारंपरिक राजकारणाला आव्हान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

 पिंपरी-चिंचवड महानगरपालिका च्या पार्श्वभूमीवर रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत नियोजनबद्ध आणि दूरदृष्टीपूर्ण राजकीय खेळी केली असल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. सत्ताधारी भाजपच्या पारंपरिक आणि प्रस्थापित राजकारणाला थेट आव्हान देत राष्ट्रवादीने यावेळी तरुण, ऊर्जावान आणि तुलनेने नवख्या चेहऱ्यांना उमेदवारी देत वेगळा प्रयोग केला आहे.

या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसने चार नवीन चेहऱ्यांना अधिकृत उमेदवार म्हणून संधी दिली असून, ही निवड केवळ बदलासाठी बदल नसून सखोल अभ्यासातून आखलेली रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत रहाटणी परिसरात मोठ्या प्रमाणात नव्या गृहप्रकल्पांमुळे स्थलांतर झाले असून, तरुण, शिक्षित आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. हा मतदारवर्ग पारंपरिक राजकारणापेक्षा नव्या विचारसरणीला, नव्या नेतृत्वाला आणि कामावर आधारित राजकारणाला प्राधान्य देतो, हा अंदाज लक्षात घेऊनच राष्ट्रवादीने ही खेळी आखल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना काटे तसेच पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली, विशेषतः अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली, प्रभागातील सामाजिक समीकरणे, सोसायटीधारक मतदार, स्थानिक प्रश्न आणि युवकांशी असलेली थेट संवादाची साखळी लक्षात घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आल्याचे सांगितले जाते. संबंधित उमेदवार गेल्या काही वर्षांपासून प्रभागात सातत्याने सक्रिय असून नागरिकांशी थेट संवाद, विविध सामाजिक उपक्रम आणि स्थानिक समस्यांवर सातत्याने उपस्थिती दाखवत असल्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

नव्या चेहऱ्यांवर आधारित हा प्रयोग मतदार कितपत स्वीकारतात, याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. बदलाची अपेक्षा बाळगणारा तरुण मतदार जर या नव्या नेतृत्वाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, तर रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आगामी प्रचाराची दिशा, स्थानिक प्रश्नांवरील स्पष्ट भूमिका आणि मतदारांशी थेट संवाद यावर या रणनीतीचे यश अवलंबून असले तरी, राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेली ही नवी राजकीय चाल प्रभागातील निवडणूक अधिक रंगतदार, चुरशीची आणि लक्षवेधी बनवणारी ठरणार, यात शंका नाही.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!