पिंपरी चिंचवड शहरातील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, प्रभाग क्रमांक २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून विशाल भालेराव यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. सामाजिक कार्य, स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि सातत्याने जनसंपर्क राखणारा चेहरा म्हणून विशाल भालेराव यांची शहरात तसेच पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
प्रभाग क्रमांक २७ हा लोकसंख्येच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि झोपडपट्टी पुनर्विकास यांसारख्या अनेक प्रश्नांमुळे हा प्रभाग नेहमीच चर्चेत असतो. या सर्व प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत नागरिकांच्या थेट संपर्कात राहणारे नेतृत्व म्हणून विशाल भालेराव यांनी गेल्या काही वर्षांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशाल भालेराव हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. कोरोना काळात नागरिकांना मदतीचा हात देणे, गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप, आरोग्य शिबिरे, युवकांसाठी क्रीडा उपक्रम, महिलांसाठी सक्षमीकरणाचे कार्यक्रम अशा विविध उपक्रमांमुळे त्यांचा जनाधार वाढताना दिसत आहे. त्यामुळे प्रभागातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही विशाल भालेराव यांचे कार्य आणि पक्षनिष्ठा लक्षवेधी मानली जाते. पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात, कार्यक्रमात आणि संघटनात्मक कामात त्यांची उपस्थिती ठळकपणे जाणवते. पक्ष नेतृत्वाच्या विचारांशी सुसंगत भूमिका घेत तळागाळातील नागरिकांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचे काम त्यांनी केले असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेते मान्य करतात.
सध्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या वाढत असली तरी, विशाल भालेराव यांचा जनसंपर्क, कार्याचा अनुभव आणि विश्वासार्ह प्रतिमा यामुळे ते इतरांपेक्षा सरस ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. स्थानिक नागरिक देखील “आमच्या प्रश्नांची जाण असलेला, कायम सोबत राहणारा उमेदवार मिळावा” अशी अपेक्षा व्यक्त करत असून, त्या निकषांवर विशाल भालेराव हे योग्य उमेदवार असल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक २७ साठी उमेदवारी जाहीर होताच राजकीय समीकरणे स्पष्ट होतील. मात्र सध्या तरी, प्रभाग क्रमांक २७ मध्ये विशाल भालेराव यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रबळ दावेदार म्हणून जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.


