शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या वतीने शनिवारी इतर पक्षातून आजी – माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश घेण्यात आला होता या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये पुणे जिल्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला यावेळी निवडणूक प्रमुख विठ्ठल उर्फ नाना काटे उपस्थित होते.
या विषयी अधिक माहिती देताना वाघेरे म्हणाले कि,२०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीत संपूर्ण शहरातून सर्वाधिक मते मिळवून मी पिंपरी प्रभाग २१ मधून विजयी झालो. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या प्रभागातून भाजपकडून मिळवलेला हा भव्य विजय असूनही, पक्षनेतृत्वाने पाच वर्षांत मला कोणतेही महत्वाचे पद किंवा समिती सदस्यत्व दिले नाही. हा जाणीवपूर्वक अन्याय असूनही मी कोणतीही तक्रार न करता पक्षासोबत एकनिष्ठ राहिलो. मात्र, नुकत्याच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात माझ्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून प्रभागातील पारंपरिक विरोधकांना प्रवेश देणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार शहर नेतृत्वाने केला. त्यामुळे सहकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर मी भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्याचे मा. नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर संदीप वाघेरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, भाजपच्या सत्ता काळात शहर नेतृत्वाने मला वेळोवेळी डावलले. तरीही मी पक्षासोबत कायम एकनिष्ठ राहिलो. मात्र नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ज्या नावांना आम्ही विरोध केला होता त्यांना जाणीवपूर्वक पक्षात प्रवेश देण्यात आला. या नावांबाबत आम्ही शहरातील पक्षाच्या चारही आमदारांशी चर्चा केली होती. व आमची नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी त्यांनीही आम्हाला याबाबत विचार करून संबंधित नावांना प्रवेश देणार नाही असे सांगितले होते. मात्र ऐनवेळी आम्हाला अंधारात ठेवून हे पक्षप्रवेश घडवले गेले. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता.
त्यानंतर प्रभागातील व पक्षातील माझे सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून अखेर आम्ही राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला व आज त्याची अंमलबजावणी झाली आहे. या निवडणुकीत पिंपरी प्रभाग क्र. २१मधून चारही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार आम्ही केला असून भविष्यात अजितदादांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच सत्ता पुन्हा एकदा येईल, असा विश्वास संदीप वाघेरे यांनी यावेळी व्यक्त केला.


