शबनम न्यूज | प्रतिनिधी
दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षने पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अजित पवार यांच्याशी कट्टर असलेले राष्ट्रवादीचे १५ माजी नगरसेवक फोडत मोठा राजकीय धक्का दिला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून आता भाजपला पिंपरीगावातून मोठा धक्का बसला असून, संपूर्ण पॅनल जिंकण्याची ताकद असलेले भाजपचे ताकदीचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
पुणे शहरातील बारामती होस्टेल येथे स्वतः अजित पवार यांनी वाघेरे यांचे स्वागत करत पक्षप्रवेश घडवून आणला. या प्रवेशामुळे पिंपरीगाव परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. माजी उपमहापौर डब्बू आसवाणी आणि संदीप वाघेरे यांच्या एकत्रित ताकदीमुळे येत्या महापालिका निवडणुकीत संपूर्ण पॅनल जिंकण्याची शक्यता अधिक बळावली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे तसेच ११ माजी नगरसेवकांनी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. या घडामोडीने राजकीय वातावरण तापले असतानाच, आता त्या प्रवेशांचे पडसाद उमटू लागले आहेत.
भाजपमधील अनेक ताकदीचे उमेदवार राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यातील महत्त्वाचे नाव म्हणजे संदीप वाघेरे. मावळ लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)कडून त्यांना उमेदवारीची ऑफर देण्यात आल्याचीही चर्चा होती. संजोग वाघेरे यांच्या ऐवजी संदीप वाघेरे उमेदवार असते, तर चित्र वेगळे दिसले असते, अशी अटकळ राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती.
पिंपरीगाव परिसरात महापालिकेच्या निधीव्यतिरिक्त स्वखर्चातूनही कोट्यवधी रुपयांची विकासकामे केल्यामुळे संदीप वाघेरे यांना मोठा जनाधार लाभला आहे. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाचा परिणाम परिसरातील दोन-तीन प्रभागांवर थेट होण्याची शक्यता असून, भाजपमध्ये प्रवेश केलेले संजोग वाघेरे व त्यांची पत्नी उषा वाघेरे यांची राजकीय जागाही आता धोक्यात आल्याचे मानले जात आहे.
या घडामोडीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.


