spot_img
spot_img
spot_img

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ४ हजार ८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून १५ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी महापालिका कार्यक्षेत्रात आज (१६ डिसेंबर) दुपारी ३ वाजेपर्यंत ४ हजार ८१९ नियमबाह्य तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले राजकीय फ्लेक्स, बॅनर्स, किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, चिन्हे, ध्वज, फलक, भिंतीवरील राजकीय जाहिराती आदी तद्सम बाबी हटविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने ही कारवाई सुरू करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि आदेशांचे पालन करण्यासाठी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय इमारतींच्या परिसरात लावण्यात आलेले अनधिकृत, नियमबाह्य जाहिरात फलक, फ्लेक्स आदी तद्सम बाबी हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. ही कारवाई करताना संबंधित राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेला सहकार्य करावे, तसेच पुढील काळात कोणत्याही स्वरूपात आचारसंहितेचा भंग होईल असे साहित्य लावू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि समतोल राखण्यासाठी आचारसंहितेची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाय राबविले असून, सर्वांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.

– श्रावण हर्डीकर, आयुक्त तथा निवडणूक अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कुठेही राजकीय स्वरूपाचे जाहिरात फलक, होर्डिंग किंवा फ्लेक्स राहू नयेत, यासाठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन तातडीने ही कारवाई करण्यात येत असून, पुढील काळातही यात सातत्य सुरू राहणार आहे.

– राजेश आगळे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!