शबनम न्यूज | प्रतिनिधी
आज ओंकार एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष साधना नेताजी काशिद यांच्यासह पिंपरी-चिंचवडमधील अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून स्वागत करण्यात आले. त्यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. नवीन सहकाऱ्यांच्या सहभागामुळे पिंपरी–चिंचवड भागातील संघटन अधिक बळकट होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनकल्याणाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
स्थानिक पातळीवर संघटन मजबूत करत विकासाभिमुख राजकारणाला चालना देण्यासाठी नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
सौ. साधना काशीद या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक लढविण्यास इच्छुक असून, त्या प्रभाग क्रमांक १ मधून निवडणुकीच्या तयारीसाठी सक्रिय प्रयत्न करीत आहेत. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या साधना काशीद यांनी नागरिकांच्या विविध समस्या, मूलभूत सुविधा, शिक्षण व विकासकामांबाबत सकारात्मक भूमिका मांडली आहे. प्रभागातील नागरिकांशी संवाद साधत त्या जनसंपर्क वाढवत असून, स्थानिक स्तरावर त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.




