शबनम न्यूज | प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्त्या नम्रता ताई रवी भिलारे या प्रभाग क्रमांक २३ मधून आगामी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून, नुकताच त्यांनी आपल्या सामाजिक व विकासकामांचा सविस्तर कार्य अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालामध्ये आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध विकास योजनांची माहिती देण्यात आली आहे.
कार्य अहवालानुसार संपूर्ण प्रभाग सीसीटीव्ही कॅमेरा सुसज्ज करण्यावर भर देण्यात येणार असून, विशेषतः महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे. युवकांसाठी रोजगाराची हमी व संधी उपलब्ध करून देणे, ‘माझा प्रभाग – स्मार्ट प्रभाग’ ही संकल्पना राबविणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र व सुसज्ज वाचनालय उपलब्ध करून देण्याचे नियोजन नम्रता ताई यांनी मांडले आहे.
याशिवाय भाजपच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. अभय योजना राबविणे, स्वच्छ व २४ तास पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न करणे, अनधिकृत बांधकामांचे ऑडिट करून नियमांनुसार अधिकृत करण्यासाठी पाठपुरावा करणे, चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी करणे, गरीब नागरिकांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, सरकारी शाळांची गुणवत्ता वाढविणे, वीज बिलातील पहिल्या ३० युनिट वीज मोफत मिळावी यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे, तसेच प्रभागातील घरकाम करणाऱ्या महिलांना पाचशे रुपये भत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कार्य अहवालात आतापर्यंत केलेल्या सामाजिक व विकासकामांचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. कोरोना काळात महिला व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान, गरजू नागरिकांना अन्नधान्य व राशन वाटप, नवीन कपडे व मिठाईचे वितरण, थेरगाव मतदारसंघ परिसरात औषध फवारणी, पूरग्रस्तांना मदत, ड्रेनेज चेंबरची कामे पूर्ण करणे तसेच रस्त्यांचे डांबरीकरण अशी अनेक कामे नम्रता ताई भिलारे यांच्या माध्यमातून करण्यात आली असल्याचे अहवालात नमूद आहे.
प्रभागातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत, “माझा प्रभाग स्मार्ट प्रभाग बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार,” असा विश्वास नम्रता ताई रवी भिलारे यांनी व्यक्त केला आहे.



