मा.नगरसेविका मनिषा प्रमोद पवार यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन
शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा माजी शिक्षण समिती सभापती मनिषाताई प्रमोद पवार यांच्या पुढाकाराने तसेच श्री शिव छत्रपती शिवाजी मित्र मंडळ थेरगाव यांच्या वतीने ‘खेळ रंगला पैठणीचा भव्य होम मिनिस्टर कार्यक्रमा’चे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम चित्रपटाचे दिग्दर्शक व सुप्रसिद्ध निवेदक जितेंद्र वाईकर प्रस्तुत असणार आहे. या भव्य अशा होम मिनिस्टर कार्यक्रमात लाखोंची बक्षिसे भेट देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात रोचक आणि ज्ञानवर्धक अशी “जरा डोके खाजवा?” ही झटपट प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. केवळ काही मिनिटांत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन सहभागी आकर्षक बक्षिसे जिंकू शकतात. सदर स्पर्धा उद्या म्हणजेच शनिवार (दि. १३ ) रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत स्थानिक नागरीकांपासून विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांसाठी सोपे, माहितीपूर्ण आणि स्थानिक प्रशासन तसेच राष्ट्रीय ज्ञानावर आधारित एकूण १५ प्रश्नांची यादी देण्यात आली आहे. या प्रश्नांमध्ये स्थानिक नगरसेविका, विधानसभेतील आमदार, विविध ऐतिहासिक दिवस, संविधान निर्माते, महापुरुषांचे जन्मदिवस, तसेच राष्ट्रीय पक्षांचे प्रतिक चिन्ह यांसंबंधी माहितीचा समावेश आहे.
स्पर्धेचे नियमही स्पष्टपणे जाहीर करण्यात आले असून, सहभागीदारांनी आपापल्या नावासह नोंदणी करणे बंधनकारक आहे. विजेत्यांची निवड पूर्णपणे उत्तरांच्या अचूकतेवर होणार असून, बक्षिसे आयोजकांच्या दिलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून स्वीकारावी लागतील.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्थानिक प्रशासन, भारतीय इतिहास आणि संविधानाविषयी जागरूकता वाढवण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. पोस्टर प्रसारित होताच समाजमाध्यमांवर स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळत असून, अनेकजण उत्साहाने सहभागी होत आहेत. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे सामान्य नागरिकांमध्ये माहितीपूर्ण संवाद वाढण्यास मदत होते.



