spot_img
spot_img
spot_img

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य – अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर

मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित पथनाट्य स्पर्धा उत्साहात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत हे अमूल्य आहे. आगामी निवडणुकीत मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदानाची जबाबदारी पार पाडावी. मतदान ही आपली जबाबदारी व हक्क असून मतदान टाळणे म्हणजे स्वतःच्या हक्काकडे दुर्लक्ष करणे होय, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने आज सादर केलेले पथनाट्य हे उत्तम दर्जाचे असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नियोजित सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या स्वीप उपक्रमांतर्गत व सीएचडीसी प्रकल्पांतर्गत पथनाट्य सादरीकरण स्पर्धा एएसएम कॉलेज ऑफ कॉमर्स, सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (सीएसआयटी) महाविद्यालयात उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त सांडभोर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.

महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, एएसएम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत सोनवणे, विभागप्रमुख डॉ. विकास बरबटे, डॉ. सचिन कुलकर्णी यांच्यासह स्पर्धेचे परीक्षक ज्ञानेश मंडळे, प्रतिक्षा इंगळे यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या, ‘मतदानाचा दिवस हा लोकशाहीचा उत्सव आहे. हा उत्सव प्रत्येकाने अभिमानाने आणि उत्साहाने साजरा करावा. लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदाराचा सहभाग अनिवार्य आहे. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. या उपक्रमांना नागरिकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे,’ असे देखील अतिरिक्त आयुक्त सांडभोर म्हणाल्या.

उपायुक्त अण्णा बोदडे म्हणाले, मतदान जनजागृती अभियानासाठी आयोजित पथनाट्य स्पर्धेला महाविद्यालयांनी चांगला प्रतिसाद दिला. प्रत्येकाने आपल्या मताचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. मतदान हे आपले कर्तव्य आहे. आज स्पर्धेमध्ये सादर झालेल्या पथनाट्यांतून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, अभिनयकौशल्य आणि आशयपूर्ण प्रस्तुती दिसून आली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघांची निवड करून लवकरच पारितोषिक वितरण करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महापालिकेतर्फे पुढील काळातही मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, यामध्ये नागरिकांनी मोठा सहभाग घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.

यावेळी स्पर्धेत विविध महाविद्यालयांच्या १३ संघांनी सादर केलेल्या पथनाट्यांनी मतदानाची गरज, लोकशाहीतील नागरिकांची भूमिका, सुजाण मतदाराची जबाबदारी, तसेच स्वविवेकाने मतदान करण्याचा संदेश प्रभावीपणे मांडला.

युवकांनी घेतली मतदानाची शपथ

आम्ही, भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि मुक्त, निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करू, अशी शपथ यावेळी उपस्थितांना देण्यात आली. उपायुक्त अण्णा बोदडे यांनी शपथेचे वाचन केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!