शबनम न्यूज
पिंपरी – एका टॅक्स कन्सल्टंटने गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकाच्या फर्मचा जीएसटी भरण्यासाठी १० लाख २ हजार ७४९ रुपये घेऊन ती रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरत कंपनीची आर्थिक फसवणूक केली. ही घटना धावडेवस्ती, भोसरी येथे जून २०२३ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत घडली.
मिलिंद विठ्ठलराव घाटे (वय अंदाजे ५५, रा. विठ्ठल बिल्डिंग, अंगणवाडी रोड, मोरेवस्ती, चिखली, मूळ देगलूर जि. नांदेड) व त्याची महिला साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ऋषिकेश रावजी थोरात (वय ३५, रा. सर्वे क्र. १७/१, मातृपितृ कृपा बिल्डिंग, धावडेवस्ती, भोसरी) यांनी मंगळवारी (दि. ९) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आर. डी. कॉर्पोरेशन या फर्मची जीएसटी रक्कम भरण्याचे काम आरोपी घाटेने स्वीकारले होते. मात्र, त्याने जीएसटी पोर्टलवर आवश्यक नोंदी न करता खरेदी विक्री बिलामध्ये फेरफार केला. जीएसटी भरण्यासाठी फिर्यादीकडून घेतलेली १० लाख २ हजार ७४९ रुपयांची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी वापरून फसवणूक केल्याचे समोर आले. भोसरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.



