शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे–सोलापूर महामार्गावरील वाढता वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा हडपसर–यवत उड्डाणपूल उभारण्यासाठी राज्य सरकारने अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे या मार्गावरील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण मागणीला यश आले आहे. या निर्णयाचे स्वागत करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री तसेच राज्य सरकार व MSIDC प्रशासनाचे आभार मानले आहेत. “जनतेच्या सोयीसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, या प्रकल्पामुळे परिसरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात सुटेल,” असे त्यांनी नमूद केले आहे.
प्रस्तावित उड्डाणपुलाचा आराखडा ‘हडपसर (१५ नंबर) ते येथील बेरोझा नाला’ या महत्त्वाच्या बिंदूवर करण्याची मागणी सातत्याने पुढे नेण्यात आली होती. या संदर्भातील पाठपुरावा आणि तांत्रिक अहवालांसाठी MSIDC कडून पुढील प्रक्रिया करण्यात आली होती. आता या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य सरकारने प्रकल्पास प्राधान्यक्रमाने मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे पुणे–सोलापूर महामार्गावर गेल्या अनेक वर्षांपासून जाणवणारा वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या घटण्याची अपेक्षा आहे.
हडपसर–यवत उड्डाणपुलाच्या मंजुरीमुळे महामार्ग विकासाला गती मिळणार असून, पुढील तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




