शाश्वत कचरा व्यवस्थापनाची नवी दिशा
शबनम न्यूज
पिंपरी : स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियान अधिक प्रभावीपणे व व्यापक पद्धतीने राबविण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या “अ” क्षेत्रीय कार्यालय, प्रभाग क्रमांक १० अंतर्गत आय.बी.एम.आर कॉलेज, इंदिरानगर येथे आधुनिक कंपोस्ट ड्रमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सहा.आरोग्य अधिकारी राजू साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात पार पडला.
महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना बळ देणाऱ्या या कार्यक्रमाद्वारे ओला कचरा जागेवरच प्रक्रिया करून त्याचे उपयुक्त सेंद्रिय खतामध्ये रूपांतर कसे करता येते, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी व उपस्थित नागरिकांनी या शाश्वत उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
स्वर्णलता मदरसन चॅरिटेबल ट्रस्ट व भारतीय प्रदूषण नियंत्रण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सॉर्ट ( SORT) प्रकल्पाअंतर्गत शैक्षणिक संस्था आणि गृहनिर्माण सोसायट्यांना ६ एरोबिक कंपोस्टर्स विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. या कंपोस्टर्सच्या साहाय्याने दररोज ७५ किलोपर्यंत ओला कचरा पर्यावरणपूरक व शाश्वत पद्धतीने प्रक्रिया करता येतो. त्यामुळे कचरा उचलण्याचा व वाहतुकीचा ताण कमी होत असून कार्बन उत्सर्जनातही घट होत आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ प्रदीप ठेंगल, सहा. आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेविषयक शहरात विविध अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये ओला व सुका कचरा वेगळा करणे, घरगुती पातळीवर ओला कचरा प्रक्रिया करणे तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जात आहेत.
या उपक्रमाद्वारे ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करून हरित व स्वच्छ शहर घडविण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्था, सोसायट्या आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
हा उपक्रम म्हणजे स्वच्छ व हरित पिंपरी चिंचवड शहराच्या या दिशेने उचललेले आणखी एक प्रेरणादायी पाऊल ठरत आहे.







