शबनम न्यूज | प्रतिनिधी
दि. सेवा विकास कॉ-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पिंपरी मध्ये २०२१ नंतर सुरू झालेल्या प्रशासकीय घोटाळ्यांमुळे बँकेवर मोठे संकट ओढावले होते. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांच्याकडून बँकेच्या सभासदांनी सध्याच्या परिस्थितीची माहिती घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा करणारे सभासद, खातेधारक, कर्मचारी व ठेवीदार यांच्या वतीने रिजर्व बँकेने रद्द केलेला परवाना पुन्हा सुरु करावा, बँक पूर्ववत सुरु करणे, तीन वर्षांचे थकीत वेतन देवून कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेणे, ठेवीदार व खातेदार यांचे पैसे परत करणे इत्यादी विषयांवर हीं सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली आहे. रविवार, दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२:३० ते २:३० या वेळेत संत तुकाराम महाराज पुतळा सभा मंडप, संत तुकाराम नगर,पिंपरी येथे ही सभा होणार आहे. सर्वसाधारण सभेस बँकेचे सभासद, बँक कर्मचारी, ठेवीदार, बँकेचे खातेदार व ग्राहक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी केले आहे.
दि. सेवा विकास सहकारी बँक पिंपरीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय आरबीआयने २०२२ साली घेतल्यानंतर २०५ कर्मचाऱ्यांची सेवाबंदी करण्यात आली होती. यानंतर प्रशासकीय प्रक्रियेतील गंभीर त्रुटी, कामगारांचा प्रलंबित वेतन प्रश्न, तसेच बँकेचे कामकाज थांबविण्याच्या आदेशासंदर्भात अनेक तक्रारी राज्य शासनाकडे दाखल झाल्या. कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करीत विविध स्तरांवर तक्रारी मांडल्यामुळे प्रकरण पुन्हा गतीमान झाले आहे.
शुक्रवारी झालेल्या बँकेच्या तपासणी दरम्यान लिक्विडेडर गैरहजर असल्यामुळे व कामगार आयुक्त कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार बँकेच्या लिक्विडेटरांनी अनेक विषयांवर समाधानकारक उत्तर न दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. बँकेचे वेतन, पूर्वीप्रमाणे कामगारांची पुनर्बांधणी, ठेवीदार व खातेदारांचे प्रलंबित आर्थिक हक्क यांसारख्या महत्त्वाच्या मुद्यांसाठी सभासदांनी संयुक्तरीत्या निर्णय घेण्याचा उद्देश या सभेमागे आहे.
बँकेशी संबंधित सर्व सभासद, कर्मचारी, ठेवीदार, खातेधारक व ग्राहक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमताने पुढील कारवाई निश्चित करावी, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.







