शबनम न्यूज : प्रतिनिधी
पिंपरी (दिनांक : १६ नोव्हेंबर २०२५) बालदिनाचे औचित्य साधून स्वरोपासना म्युझिक अकॅडमी प्रस्तुत ‘गीत फुलोरा’ या गेय कवितांच्या कार्यक्रमाला रहाटणी येथील एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्याध्यापिका जयश्री वेंकटरामन, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी जी, मधुमिता देव, हेमराज थापा, विजय नेलगे, सोनल श्रीवास्तव यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घेतला होता. स्वरोपासनाच्या वाकड कस्पटेवस्ती तसेच पुनावळे काटेवस्ती या शाखांमधील संगीत शिकणारे ओंकार कुलकर्णी, आर्यन पावसे, प्रिया जोशी, वीरा सुरते, राजश्री पटेल, अश्वि नाकाडे या विद्यार्थ्यांनी अभयार्पिता निर्मित ‘गीत फुलोरा’ या गेय मराठी कवितांचे सादरीकरण केले.

यामध्ये ‘शाळा’ , ‘माझ्या मराठीची गोडी’ , ‘आई’ , ‘चांदोमामा’ , ‘आर्जव’ , ‘पाहुणचार’ , ‘या बालांनो या रे या’ , ‘एक झाड लावू’ अशा सुरेल कविता सादर होत असताना आधी श्रोत्यांच्या भूमिकेत असलेले विद्यार्थी आणि शिक्षकही नकळत ठेका धरत अन् गायनसाथ करीत त्यामध्ये सामील झाले. अर्जुन नेटके, वंशराज वरखेडे, विकास शिंदे, आलोक पाटोळे, नयन शिवरकर, आर्यन पावसे यांनी वाद्यांची नेटकी साथसंगत करीत कार्यक्रमात रंग भरला. अथर्व कुलकर्णी आणि भाग्यदा कुलकर्णी यांनी कवितांची निवड आणि त्यांना चाली लावण्यासाठी विशेष कष्ट घेतले होते.
‘गीत फुलोरा’ या उपक्रमाबाबत स्वरोपासनाचे अभय कुलकर्णी आणि अर्चना कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, २००४ पासून हा कवितांचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला असून मराठीसोबतच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी कवितांची गोडी लागावी म्हणून वेगवेगळ्या शाळांमधून एकवीस वर्षांपासून आम्ही हा उपक्रम राबवीत आहेत. माध्यम कोणतेही असलेतरी गेय कवितांची निवड आणि त्याला संगीताची सुरेल साथ यामुळे या उपक्रमात मंत्रमुग्ध होऊन विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी होतात.








