शबनम न्यूज | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून जैन बोर्डींग प्रकरण चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील आरोप होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. यामध्ये “मामाच्या गावाला जाऊया, जैन मंदिर खाऊया,” अशा घोषणा देत भाजप विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मुरलीधर मोहोळ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात आली.

शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आंदोलन पार पडले. यावेळी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त हे मुख्यमंत्र्यांचे सख्खे मामेभाऊ आहेत. या आयुक्तांना हाताशी धरून अवघ्या काही दिवसात हा भ्रष्ट व्यवहार पूर्ण करण्यात आला. म्हणूनच मामाच्या गावाला जाऊया जैन मंदिर खाऊया, या माथाळ्याखाली हे आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन धर्मदाय आयुक्त कार्यालय, ढोले पाटील रोड, पुणे येथे करण्यात आले असून या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह ,असंख्य जैन बांधवांनी, पुणेकरांनी भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध व्यक्त केला.








