पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहात बालरंगभूमीपासून लोकसंस्कृतीचा प्रवास उलगडतोय
पिंपरी, ५ ऑक्टोबर २०२५ : पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून साजरा होत असलेला ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ सध्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्त पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात महापालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी ‘राजा सिंह’ हे बालनाट्य तर नागरिकांसाठी ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली शहरातील विविध नाट्यगृहांमध्ये या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये चर्चा सत्रे, मराठी नाटके, एकांकिका, बालनाट्य, कवी संमेलन, साहित्यिक चर्चा, कथा वाचन, अभंगवाणी, भजन स्पर्धा, सुलेखन स्पर्धा, पसायदान स्पर्धा अशा मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या कार्यक्रमांचा समावेश आहे. त्याच अनुषंगाने पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात विविध कार्यक्रम पार पडले.
‘राजा सिंह’ नाट्याच्या कथानकातील सिंहाच्या व्यक्तिरेखेतून धैर्य, प्रामाणिकपणा, संकटांवर मात करण्याची ताकद तसेच एकतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. मनोरंजक प्रसंग, रंगीत वेशभूषा, नृत्य आणि गीतांनी नाटकाला बालरसिकांच्या मनात वेगळे स्थान मिळवून दिले. विद्यार्थ्यांनी प्रयोगातील संवाद आणि प्रसंगांना टाळ्यांची दाद दिली.
महापालिकेच्या वतीने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियमितपणे होत असल्याने मुलांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढत असून पुढील पिढी भाषेच्या समृद्धीसाठी नक्कीच योगदान देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. हा कार्यक्रम विद्यार्थीदशेतील मुलांवर मराठी भाषेचे संस्कार करणारा आणि त्यांना मराठी लोकनाट्याची प्रचिती घडवून देणारा ठरला.
…..
यानंतर दुसऱ्या सत्रात याठिकाणी ‘महाराष्ट्राचा मराठी बाणा’ हा मराठी संस्कृतीतील विविध पैलूंवर प्रकाश टाकणारा कार्यक्रम संपन्न झाला.