पुणे: बावधन येथील सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमांतर्गत सूर्यदत्त मल्टी डिसीप्लिनरी इंटिग्रेटेड ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्या वतीने बुधवार, दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत बावधन कॅम्पसमधील बन्सी-रत्न सभागृहात हे शिबीर होणार आहे.
‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि संस्थेच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली प्रायोगिक (मॉक) सूर्यदत्त धन्वंतरी हॉस्पिटल उभारले असून, या उपक्रमाची सांगता रक्तदान शिबीराने होत आहे. फिजिओथेरपी, नर्सिंग, फार्मसी, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट, इंटेरिअर डिझाईन आदी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले आहेत.
सूर्यदत्त शिक्षण संकुलामधील सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक यांच्यासह संस्थेशी संबंधित सर्व हितचिंतक व पुणेकरांसाठी हे रक्तदान शिबीर खुले आहे. अधिकाधिक नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.