spot_img
spot_img
spot_img

गणेश तलाव येथे गणेशमूर्ती विसर्जन प्रसंगी सोयीसुविधा पुरविण्याविषयी निवेदन सुपूर्द

पिंपरी (दिनांक : २२ ऑगस्ट २०२५) निगडी प्राधिकरणातील प्रभाग क्रमांक १५ मधील गणेश तलाव  येथे गणेशमूर्ती विसर्जन प्रसंगी सोयीसुविधा पुरविण्यात याव्या, असे पिंपरी – चिंचवड भाजपा उपाध्यक्ष सलीम शिकलगार यांनी प्रशासन अधिकारी, अ क्षेत्रीय कार्यालय, पिंपरी – चिंचवड महानगरपालिका, निगडी प्राधिकरण यांचेकडे गुरुवार, दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी लेखी निवेदन सादर केले आहे. 
या निवेदनात प्रभाग क्रमांक १५ मधील गणेश तलाव, निगडी प्राधिकरण येथे प्राधिकरण, निगडी, आकुर्डी परिसरातील गणेशभक्त मूर्तिविसर्जन करतात. सदर ठिकाणी गणेशभक्तांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार पेटी, स्वच्छतागृह यासारख्या सोयीसुविधा पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्याव्यात. गणेश तलाव प्राधिकरण, निगडी या पवित्र ठिकाणी पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून गणेशभक्तांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारले जाते. त्या व्यासपीठाचा वापर करून राजकीय व्यक्ती आपल्या राजकीय प्रसिद्धीसाठी गैरवापर करतात; त्याचप्रमाणे विविध प्रकारचे स्वागताचे फलक आणि बॅनर तलावाच्या आतील परिसरात उभारण्यात येऊन सदर जागेच्या पावित्र्याला बाधा पोहोचवितात; तसेच परिसराचे विद्रूपीकरण करतात. तरी सदर ठिकाणी गणेशभक्तांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून तलावाचे पावित्र्य राखले जाईल याची दक्षता घ्यावी, असे या लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सलीम शिकलगार यांच्यासह माजी महापौर आर. एस. कुमार आणि सामाजिक कार्यकर्ते नीलेश शिंदे यांनी हे निवेदन सुपूर्द केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!