डॉ. एउन्जु लिम यांची पत्रकार परिषदेत माहिती
शबनम न्यूज | प्रतिनिधी
कोरियन भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि व्यावसायिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. बालेवाडी येथील युथबिल्ड फाउंडेशनच्या आवारात असलेल्या इंडो-कोरियन सेंटरला (आयकेसी) कोरियाच्या शिक्षण मंत्रालयाअंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल एज्युकेशनच्या (एनआयआयईडी) वतीने ‘टोपिक’ परीक्षेसाठी अधिकृत टोपिक संस्था व परीक्षा केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे पश्चिम भारतातील एकमेव केंद्र म्हणून पुण्याचा गौरव झाला आहे, अशी माहिती इंडो कोरियन सेंटर व किंग सेजोंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. एउन्जु लिम व इंडो कोरियन सेंटरचे सहसंस्थापक संजीब घटक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. एउन्जु लिम म्हणाल्या, “कोरियाच्या मुंबईतील वाणिज्य दूतावासाच्या कार्यक्षेत्राखाली कार्यरत असलेल्या इंडो कोरियन सेंटरमार्फत विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना आणि कोरियन विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण अथवा रोजगाराच्या संधी शोधणाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असलेले प्रमाणपत्र मिळणार आहे. १९९७ पासून सुरू असलेली ‘टोपिक’ परीक्षा ही कोरियन सरकारची अधिकृत भाषा प्रावीण्य चाचणी आहे. वाचन, लेखन आणि श्रवण कौशल्य तपासणारी ही परीक्षा आहे. कोरियन विद्यापीठांमध्ये प्रवेश, कोरियन कंपन्यांमध्ये नोकरी, व्हिसा प्रक्रिया तसेच शैक्षणिक प्रगतीसाठी या परीक्षेचे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते. ‘टोपिक-१’ ((प्राथमिक – स्तर १ व २) आणि ‘टोपिक-२’ (मध्यम व उच्च – स्तर ३ ते ६) असे या परीक्षेचे दोन प्रकार आहेत. या प्रमाणपत्राची वैधता दोन वर्षे असते.”
संजीब घटक म्हणाले, “टोपिक ही केवळ भाषा चाचणी नसून, शिक्षण, उद्योग आणि संस्कृती या क्षेत्रांतील कोरिया-भारत सहकार्याला आवश्यक असलेल्या मानवी संसाधन विकासाचे साधन आहे. इंडो कोरियन सेंटर येथे कार्यरत किंग सेजोंग इन्स्टिट्यूट पुणे येथे कोरियन भाषा अभ्यासक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचे कार्यक्रम राबवले जातात. पुढील काळात वर्षातून तीनवेळा ‘टोपिक’ परीक्षा घेतली जाणार आहे. तसेच करिअरविषयक शिक्षण व उद्योगसंस्था सहकार्य उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. पुणे केंद्रास अधिकृत मान्यता मिळाल्याने कोरियन भाषा शिक्षण आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी पुणे एक महत्वाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. भारतीय विद्यार्थ्यांना कोरियात शैक्षणिक आणि व्यावसायिक संधी साधण्यासाठी नवे मार्ग खुले झाले आहेत.”
‘टोपिक’ परीक्षा १६ नोव्हेंबरला
यावर्षी ११ मे रोजी पुण्यातील इंडो-कोरियन सेंटरमध्ये १०० वी ‘टोपिक’ परीक्षा पार पडली. आता १०३ वी परीक्षा १६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून, प्रत्येक सत्रात २०० उमेदवारांसाठी जागा उपलब्ध राहतील. नोंदणी २६ ऑगस्टपासून सुरू होऊन ३१ ऑगस्टपर्यंत किंवा जागा पूर्ण होईपर्यंत चालणार आहे. https://justkiwa.in/index.php/topik/ या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येतील, असे डॉ. एउन्जु लिम यांनी नमूद केले.