शबनम न्यूज | प्रतिनिधी
“विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात प्रत्यक्ष अनुभव देत त्यांचे कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी रोबोटिक्स लॅब उपयुक्त ठरणार आहे. ही प्रयोगशाळा केवळ तंत्रज्ञान शिकवणारी नाही, तर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणारी, त्यांच्या कल्पकतेला वाव देणारी आणि त्यांना भविष्यातील अर्थव्यवस्थेत आत्मविश्वासाने सहभाग घेण्यास प्रोत्साहन देणारी आहे. या रोबोटिक्स लॅबमुळे विद्यार्थ्यांना रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण देऊन नवकल्पनाना विकसित करणे शक्य होणार आहे,” असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी केले.
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे लीडरशिप फॉर इक्विटी आणि रोबोटेक्स इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या अत्याधुनिक रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन शेखर सिंह यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी झाले. प्रसंगी सायन्स पार्कचे संस्थापक संचालक प्रवीण तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रद्धा खापरिया, लीडरशिप फॉर इक्विटीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर रेड्डी बानुरी, मुख्य कार्यपालन अधिकारी दामिनी माईनकर, रोबोटेक्स इंडियाच्या कार्यपालन प्रमुख मनीषा सावंत आदी उपस्थित होते.
लीडरशिप फॉर इक्विटीने अलीकडेच सायन्स पार्कमध्ये एक अत्याधुनिक कम्प्युटर सायन्स कोडिंग लॅब स्थापन केली आहे. आसपासच्या शाळांमधील विद्यार्थी ब्लॉक-कोडिंग शिकून विवध प्रकल्प व अनिमेशन तयार करत आहेत. आता रोबोटेक्स इंडियाच्या भागीदारीत उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक रोबोटिक्स प्रयोगशाळेमुळे पिंपरी चिंचवडमधील विद्यार्थ्यांना आणखी संधी उपलब्ध होणार आहेत. यामुळे त्यांना रोबोटिक्स व प्रोग्रामिंग अधिक सखोलपणे शिकता येईल. त्यातून ते नवनिर्मिती करू शकतील आणि आपला दृष्टिकोन विस्तारू शकतील,” असा विश्वास दामिनी माईनकर यांनी व्यक्त केला.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना रोबोटिक्स स्पर्धांमध्ये सहभागासाठीही प्रशिक्षण दिले जाईल. यात उद्योजगता चॅलेंज, लाईन फॉलोअर, मेझ सॉल्व्हर आणि गर्ल्स फायर फाईट अशा रोमांचक श्रेणीचा समावेश आहे. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांची तांत्रिक क्षमता वाढण्याबरोबरच संघभावना, नेतृत्वगुण आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित होईल, असे मनीषा सावंत यांनी नमूद केले.
या उपक्रमाचे सातत्य टिकवण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. निवडक शाळांतील शिक्षकांना विशेष प्रशिक्षण देऊन ते विद्यार्थ्यांना लॅबमध्ये मार्गदर्शन करतील, ज्यामुळे कार्यशाळा संपल्यानंतरही शिक्षणाची प्रक्रिया कायम राहील आणि दीर्घकालीन परिणाम साधता येईल, असे डॉ. श्रद्धा खापरीया यांनी सांगितले.