शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमध्ये खान्देशी बांधवांनी आपली संस्कृती जपून शहराला ‘मिनी खान्देश’चे स्वरूप दिले आहे, असे गौरवोद्गार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काढले. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित ‘खान्देश सार्वजनिक श्री कानबाई माता उत्सव २०२५’ च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. हा उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नसून, आपल्या संस्कृती आणि परंपरेचा जागर असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज दुपारपासूनच उत्सवाची सुरुवात श्री कानबाई मातेच्या भव्य मिरवणुकीने झाली. श्री तुळजाभवानी मंदिर, शिवनगरी येथून सुरू झालेली ही मिरवणूक आहेर गार्डन, वाल्हेकरवाडी येथे पोहोचली. मिरवणुकीमध्ये शिरपूर येथील गोल्डन बँड आणि अमळनेर येथील राधे कृष्ण बँडच्या संगीताने एक वेगळीच ऊर्जा संचारली होती. या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण धुळे आणि नंदुरबार येथील आदिवासी समाज बांधवांचे नेत्रदीपक नृत्य ठरले. पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर कलश घेऊन चालणाऱ्या महिला आणि पारंपरिक पोशाखातील पुरुषांचा सहभाग लक्षवेधी होता.
महाजन आपल्या भाषणात म्हणाले, “आज पिंपरी-चिंचवडमध्ये हजारो खान्देशी बांधवांना एकत्र आलेले पाहून मला खूप आनंद होत आहे. हा उत्सव केवळ पूजा-अर्चा किंवा विधीचा कार्यक्रम नाही, तर आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा जागर आहे. पिंपरी-चिंचवड हे एक असे शहर आहे, जिथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले आहेत आणि या शहराने सर्वांना आपलेसे केले आहे. कामासाठी, रोजगारासाठी आपण इथे आलो असलो तरी, आपली संस्कृती आणि परंपरा आपण विसरलेलो नाही, हेच या उत्सवातून सिद्ध होत आहे. खान्देशाची संस्कृती, अहिराणी भाषा आणि लोककला समृद्ध आहेत. आपली ही समृद्ध परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. कानबाई माता ही खान्देशातील प्रत्येकाच्या घरात असलेली देवता आहे. या मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असाच राहो, अशी मी प्रार्थना करतो. तुम्ही सर्वजण एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत आहात, ही एक चांगली गोष्ट आहे. हा उत्साह असाच कायम राहो!”
सायंकाळी आहेर गार्डन येथे मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री कानबाई मातेचे पूजन करून उत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “खान्देशातील बांधवांनी पिंपरी-चिंचवडमध्ये येऊन आपली संस्कृती आणि परंपरा जपली आहे, हे पाहून मला अभिमान वाटतो. या शहरात ‘मिनी महाराष्ट्र’ पाहायला मिळतो आणि आजचा हा उत्सव त्याचाच एक भाग आहे. कानबाई माता ही शक्तीचे प्रतीक असून, तिचे आशीर्वाद आपल्याला सदैव मिळोत. खान्देशी बांधवांनी आपले पारंपरिक लोकसंगीत, आपली भाषा आणि प्रथा जपायला हव्यात.”
कार्यक्रमात जलसंपदामंत्री गिरीश महाजन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार मंगेश चव्हाण, शंकर जगताप, उमा खापरे, राजू मामा भोळे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील, सुरेखा जाधव यांच्यासह स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी आणि सर्व खान्देशी समाज बांधव उपस्थित होते. उत्सवाच्या आयोजकांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
नामदेव ढाके यांचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक नामदेव ढाके यांनी प्रास्ताविकात उत्सवाचा मुख्य उद्देश सांगितला. ते म्हणाले, “या उत्सवाचा उद्देश पिंपरी-चिंचवडमधील सर्व खान्देशी बांधवांना एका व्यासपीठावर आणणे आहे. आपल्याला आपल्या मूळ गावापासून दूर राहावे लागत असले तरी, आपल्या गावाकडील मातीचा सुगंध, आपली संस्कृती आणि आपले पारंपरिक सण-उत्सव आपण विसरू शकत नाही. खान्देशातील संस्कृतीची ओळख आपल्या पुढील पिढीला करून देणे, हे आपले कर्तव्य आहे.”
रात्री ८ वाजल्यापासून श्री कानबाई मातेच्या गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम सुरू झाला. श्री कानबाई फ्रेंड्स सर्कल ग्रुप, शिरपूर-धुळे-पुणे चे गायक सागर देशमुख, दिलीप शिंदे, कुणाल महाजन आणि दिनेश शिंदे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात भक्तिगीते सादर करून उपस्थितांना भक्तीरसात चिंब केले.
हा उत्सव पिंपरी-चिंचवडमधील खान्देशी बांधवांच्या एकजुटीचे आणि सांस्कृतिक अभिमानाचे प्रतीक ठरला आहे. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी ५०० हून अधिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमलता चौधरी यांनी केले, तर हेमंत चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्या, सोमवार ४ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता श्री कानबाई मातेच्या विसर्जन मिरवणुकीने या तीन दिवसीय उत्सवाचा समारोप होईल. ही मिरवणूक आहेर गार्डन येथून सुरू होऊन जाधव घाट, रावेत येथे विसर्जित होईल.