spot_img
spot_img
spot_img

आपत्तीकालीन परिस्थितीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीकालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज झाला आहे. अग्निशमन विभागाने प्रत्येक प्रभागनिहाय विशेष पूर नियंत्रण पथके कार्यरत केली आहेत. या पथकांची जबाबदारी पूरस्थितीत त्वरित मदत पुरवणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आणि परिसरातील बचावकार्य सुकर करणे, अशा स्वरूपाची असणार आहे.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे बचाव कार्यासाठी पुरेशा प्रमाणात उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये १० रबर बोट्स (IRB), २०० लाइफ जॅकेट्स, ४४ लाइफ रिंग्स, ५९ रोप्स, १० हुक्स, १३ पोर्टेबल पंप, वॉटर टेंडर, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल, फायर फायटिंग मोटारसायकल, ४८ कार्यरत अग्निशमन वाहने, वायरलेस सेट्स, वॉकीटॉकी, मेगाफोन व टॉर्चेस यासारख्या आधुनिक साहित्यांचा समावेश आहे.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत संबंधित प्रभागीय कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जेणेकरून आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये पथके त्वरित घटनास्थळी पोहोचतील. तसेच ज्या भागात पाणी शिरण्याचा धोका आहे, अशा भागांची यादी तयार करण्यात आली असून त्या भागात पथकांनी गस्त वाढवली आहे. आवश्यकतेनुसार १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन), १०८ (आपत्कालीन मदत क्रमांक) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पथकांची जबाबदारी व कामकाज

महापालिकेच्या पथकांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असून ते पूरग्रस्त भागांची ओळख, पाण्याची पातळी, वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि साचणाऱ्या ठिकाणांची माहिती ठेवतात. पथकांना स्थानिक परिसराचे अचूक ज्ञान आहे तसेच पथकातील सदस्यांना पोहण्याचे व रेस्क्यू तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरी पूरस्थिती किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता, चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांची मदत घ्यावी. ही मदत पूर्णतः विनामूल्य उपलब्ध आहे, असेही अग्निशमन विभागाकडून कळवण्यात आले आहे.

अग्निशमन पथकांची कामे

• पाणी भरलेल्या/साचलेल्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत 10000 LPM क्षमतेचे डी-वॉटरिंग पंपाच्या साहाय्याने पाणी काढणे.

• पूरस्थितीत नागरिकांना लाइफ जॅकेट, रबर बोट आणि रोपच्या मदतीने सुरक्षित स्थळी नेणे.

• झाड पडल्यास चेन सॉ आणि इतर उपकरणांनी त्वरित मार्ग मोकळा करणे.

• आपत्कालीन परिस्थितीत रेस्क्यू व्हेईकलद्वारे घटनास्थळी जलद पोहोचणे.

• काही अपरिहार्य कारणास्तव विद्युत यंत्रणेमधील तांत्रिक बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठ्यात गळती (शॉर्ट सर्किट) झाल्यास सदर ठिकाणी विद्युत विभाग/महावितरण यांच्या मार्फत विद्युत पुरवठा सुरक्षिततेच्या कारणास्तव खंडित/पूर्ववत करणे.

• नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करणे.

नागरिकांचा जीव आणि सुरक्षितता आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्तीकालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी प्रभागनिहाय नियुक्त केलेल्या पथकाकडे आवश्यक साधनसामग्री आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आपत्ती व्यवस्थापन विभागाशी थेट संपर्क साधावा.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

आपत्तीकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचा अग्निशमन विभाग सज्ज आहे. पावसाचे पाणी भरलेल्या घरांमधून पंपिंग यंत्रांच्या मदतीने पाणी बाहेर काढणे, झाड पडल्यास चेन सॉने मार्ग मोकळा करणे, तसेच रबर बोट व लाइफ जॅकेटच्या साहाय्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे अशी सर्व व्यवस्था सज्ज आहे. नदीकाठच्या भागात देखील बचाव कार्य करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!