शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘आजच्या पिढीत वाचनसंस्कृती रुजलेली नाही. या पिढीने किती मराठी पुस्तके वाचली आहेत किंवा किती मराठी लेखकांची नावे त्यांना माहीत आहेत याची शंका वाटते. त्यामुळे दिवाळी अंकासारखी ज्ञानगंगा जपणे, आपली अभिरुची संपन्नता जपणे गरजेचे आहे,’ असे मत अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांनी व्यक्त केले.
स्वर्गवासी कमलाबाई रसिकलाल धारिवाल पुरस्कृत छंदश्री आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पुरस्कार वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. भारत सासणे, ज्येष्ठ लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, स्पर्धेचे परीक्षक माधव राजगुरू, संयोजक दिनकर शिलेदार, प्राजक्ता शिलेदार आदी उपस्थित होते. यावेळी विविध विभागांमध्ये एकूण ४२ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
निशिगंधा वाड म्हणाल्या, “आईमुळे मीही लिहिते झाले. तिच्या पहिल्या लेखनाचे आम्ही वाचक असायचो. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरी माझी पहिली कविता मराठीत केली होती. दिवाळी अंक माणसाला अधिक समृद्ध करतात.”
प्रा. जोशी म्हणाले, “दिवाळी अंक ही लेखकांसाठीची प्रयोगशाळा आहे. दिवाळी अंकांनी लेखकांसह संपादकांना आणि चित्रकारांनाही प्रतिष्ठा मिळवून दिली. आज दिवाळी अंकांची संख्या वाढत असली तरी त्यांची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे.”
भारत सासणे म्हणाले, “दिवाळी अंकांची ही परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली असून, मराठी व बंगाली भाषेत विशेषांक निघतात. अनेक आव्हानांवर मात करून ही परंपरा जपणाऱ्या संपादकांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम आहे.”
‘साहित्याला कुठलाही धर्म नसतो,’ हा मुद्दा अधोरेखित करीत डॉ. कार्व्हालो यांनी, नाताळ तसेच ईदनिमित्त प्रकाशित होणाऱ्या अंकांचाही या पुरस्कारांमध्ये समावेश केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.