शबनम न्यूज | प्रतिनिधी
दौंडहून पुण्याकडे जाणाऱ्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डेमू) गाडीच्या एका डब्यात सोमवारी सकाळी येवत रेल्वे स्थानकाजवळ आग लागल्याचा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. डब्यातून धूर बाहेर पडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पुणे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दौंडहून येणारी ही गाडी सकाळी ७.५२ वाजता यवत स्थानकावर थांबली होती. त्याच दरम्यान, एक मध्यमवयीन व्यक्ती डब्यात आला आणि त्याने बिडी पेटवून स्वच्छतागृहाच्या जवळ असलेल्या कचरापेटीत टाकली. त्यानंतर डब्यातून धूर येऊ लागला. गाडी स्थानकावरच असल्याने रेल्वेचे कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले.