शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 28 रहाटणी, पिंपळे सौदागर मधील महानगरपालिकेचा दवाखाना व तालीमचे स्ट्रक्चर ऑडिट करून त्या जागी अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त नव्याने दोन्ही वास्तू बांधण्यात यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी मनपा आयुक्तांना केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 28 रहाटणी, पिंपळे सौदागर मध्ये परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेच्या वतीने दवाखाना बांधण्यात आला असून, तो सध्या खूप जुना झाला असून नागरिकांसाठी या दवाखान्यातील जागा देखील अपुरी पडत आहे याच दवाखान्यात नागरिकांना बसण्यासाठी येथे तात्पुरत्या स्वरूपात पत्राशेडची उभारणी देखील केलेली आहे तसेच लहान मुलांसाठी या दवाखान्यात लसीकरण देखील असते तेव्हा देखील नागरिकांची गैरसोय होते.
तसेच पिंपळे सौदागर गावात अनेक कुस्ती, कबड्डी व विविध खेळातील खेळाडू आहेत, त्यांना व्यायाम सराव करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने तालीम व जिम बांधण्यात आलेली आहे. या तालमीची देखील वारंवार दुरुस्ती व डागडुजी करण्यात आलेले असून ती सुद्धा जुनी व जीर्ण झालेली आहे, तिथे देखील स्ट्रक्चर ऑडिट करून नवीन बांधण्याची सध्या गरज आहे. त्याच प्रमाणात प्रभाग क्रमांक 28 राहटणी, पिंपळे सौदागर मधील दवाखाना व तालीम या दोन्ही वस्तू सध्या स्थितीत चालू असून त्या जुन्या व जीर्ण देखील झालेले आहेत. ही बाब विचारात घेता या दोन्ही वास्तूचे स्ट्रक्चर ऑडिट करून नवीन अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त दवाखाना व तालीम बांधण्यात यावी, असेही सदर निवेदनात नाना काटे यांनी नमूद केले आहे.