मा. उपमहापौर, नगरसेविका सौ. शैलजाताई अविनाश मोरे यांची आयुक्तांकडे मागणी…
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मा. उपमहापौर तथा विद्यमान नगरसेविका सौ. शैलजाताई अविनाश मोरे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन त्यांना प्रभाग क्र. १५ मधील धोकादायक व अनधिकृत केबल्स आणि वायरचे जाळे तात्काळ हटवण्याबाबत नुकतेच निवेदन सादर केले.
यावेळी त्यांच्यासोबत प्रभागातील ॲड. सौ. प्रतिभा दलाल, सौ. ज्योती कानिटकर, सौ. शर्मिला महाजन आणि सौ. स्मिता मोडक उपस्थित होत्या.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सौ. शैलजाताई अविनाश मोरे यांनी म्हटले आहे की, ”प्रभाग क्र. १५ मध्ये विविध खाजगी कंपन्यांच्या इंटरनेट केबल्स, डिश टीव्हीच्या वायर्स आणि इतर तारांचे अनधिकृत व धोकादायक जाळे मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहे. अनेक ठिकाणी या वायर्स झाडांवरून, सोसायट्यांच्या भिंतींवरून तसेच सार्वजनिक रस्त्यांवर अतिशय खालच्या स्तरावरून गेलेल्या असून, लोंबकळणाऱ्या तारांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अत्यंत दुर्दैवी बाब म्हणजे, या निष्काळजीपणाचा बळी म्हणून सेक्टर नं. २६, प्राधिकरण, निगडी येथील रहिवासी सौ. पटवर्धन यांचा या केबल्सच्या विळख्यात अडकून मृत्यू झाला आहे. ही घटना प्रशासन व संबंधित कंपन्यांच्या हलगर्जीपणाचे द्योतक असून, वेळीच कारवाई झाली असती तर हा अनर्थ टाळता आला असता, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
या घटनेमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ युद्धपातळीवर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
त्वरित उपाययोजना करा…
प्रभाग क्र. १५ मधील सर्व अनधिकृत, लोंबकळणाऱ्या व झाडांवरून गेलेल्या धोकादायक केबल्स तात्काळ हटवण्याचे आदेश द्या. संपूर्ण शहरातील अशा प्रकारच्या वायरचे सर्वेक्षण (ऑडिट) करून भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा.




