spot_img
spot_img
spot_img

अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाला विजेतेपद

एमआयटी-एडीटी आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत ४१ धावांनी मिटकाॅमवर मात; सफल घिमिरे सामनावीर, पुरंजय राठोड मालिका वीर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी (एमआयटी-एडीटी) विद्यापीठात संस्थेचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या ६० व्या वाढदिवसाचे औचित्याने आयोजित आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठ क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उत्साहात पार पडला. या सामन्यात अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठ, लोहगाव (पुणे) संघाने प्रभावी खेळ करत एमआयटी काॅलेज ऑफ मॅनेजमेंट (मिटकॉम), लोणी काळभोर संघावर ४१ धावांनी विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

अंतिम सामन्यात अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाने प्रथम फलंदाजी करत १६५ धावांची भक्कम उभारणी केली. प्रत्युत्तरात एमआयटी मिटकॉम संघ १२४ धावांवर सर्वबाद झाला. विजेत्या संघाकडून सफल घिमिरे याने उत्कृष्ट कामगिरी करत ‘सामनावीर’ पुरस्कार मिळवला.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे संघाने एमआयटी स्कुल ऑफ कंम्युटिंग (एसओसी), लोणी काळभोर संघावर १७ धावांनी मात केली. आर्मी संघाने ९५ धावा केल्यानंतर एमआयटी एसओसी संघ ७७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या सामन्यात चरण कुमार डोक्कारी याला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरविण्यात आले.

स्पर्धेतील ‘मालिका वीर’ पुरस्कार अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पुरंजय सिंह राठोड याने ९ विकेट्स घेत उत्कृष्ट गोलंदाजी केल्याबद्दल पटकावला.

२३ ते २७ एप्रिल २०२६ या कालावधीत एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. विजेते व उपविजेते संघांना ५० हजारांची रोख पारितोषिके, चषक, पदके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभाग संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, ब्रिगेडीअर मंगेश विटेकर आदी उपस्थित होते.

संक्षिप्त धावफलकः अजिंक्य डी.वाय.पाटील विद्यापीठः २० षटकांत ९ बाद १६५ (दिव्यांश ३७-२२ चेंडू,संग्राम घुमरे ३२-२२ चेंडू; पुष्कर २-२६, प्रणय वाघ २-२४, नकुल शर्मा २-१९, निशांत चौधरी २-२३) विजयी वि. एमआयटी मिटकाॅमः १७ षटकांत सर्वबाद १२४ (तनिष्क चौबे ३३-२१ चेंडू, किशोर दिवटे ४३-३४ चेंडू; सफल घिमिरे ४-३१,पुरंजय राठोड २-३०); सामनावीर- सफल घिमिरे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!