spot_img
spot_img
spot_img

पिंपळे सौदागरमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा; नवीन ‘वाय जंक्शन’ रस्त्याची नगरसेविका अनिता काटे यांची मागणी

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपळे सौदागर (प्रभाग क्र. २८) परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नवीन रस्त्याचा समावेश करण्याची मागणी पुढे आली आहे. याबाबत नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या उपसंचालकांकडे निवेदन सादर केले आहे.

निवेदनानुसार, प्रभाग क्रमांक २८ मध्ये सातत्याने वाढणाऱ्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नाशिक फाटा ते कोकणे चौक हा बीआरटीएस मार्ग तसेच कुणाल आयकॉन समोरील डी.पी. रस्ता हे परिसरातील प्रमुख मार्ग असून, हे दोन्ही रस्ते कोकणे चौक आणि शिवर चौक येथे एकत्र येतात. परिणामी या ठिकाणी वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत.

या पार्श्वभूमीवर पिके चौक ते कुंजीर चौक दरम्यान नवीन रस्ता प्रस्तावित करण्याची मागणी करण्यात आली आहे. हा रस्ता संरक्षण विभागाच्या हद्दीतून जात जगताप डेअरी बीआरटीएस रोडजवळ ‘वाय जंक्शन’ स्वरूपात विकसित करण्यात यावा, असा प्रस्ताव आहे. या पर्यायी मार्गामुळे वाहतुकीचा ताण कमी होऊन कोंडी सुटण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच, हा प्रस्ताव नवीन विकास आराखड्यात (डीपी) समाविष्ट करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या मागणीला नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि नगरसेविका कुंदा भिसे यांनीही पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, या प्रस्तावावर महापालिकेच्या नगररचना विभागाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल का, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!