spot_img
spot_img
spot_img

मोशीत विद्यार्थिनींच्या पुढाकारातून साकारला ‘शून्य कचरा’ वर्ग!

शबनम न्यूज | प्रतिनिधी

मोशी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या शाळा क्रमांक १०७ येथे इयत्ता सहावी ‘ब’ वर्गामध्ये “शून्य कचरा वर्ग” या अभिनव संकल्पनेवर आधारित नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. शाळेतील शून्य कचरा प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींमध्ये स्वच्छतेची जाणीव आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचा उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, ममता शिंदे, सहायक आयुक्त किरणकुमार मोरे, अजिंक्य येळे, प्रशासन अधिकारी संगिता बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या शून्य कचरा प्रकल्पाला मोशी येथील सावित्रीबाई फुले प्राथमिक कन्या शाळा क्रमांक १०७ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमांतर्गत वर्गात कचरा निर्माण होऊ नये यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले असून कागदाचा अपव्ययही कमी झाला आहे. फाटलेले कागद व्यवस्थित करून पुनर्वापरासाठी वेगळ्या बॉक्समध्ये ठेवले जातात. पेन्सिलचा कचरा वेगळ्या बरणीत गोळा करून त्यापासून खत तयार केले जाते आणि ते शाळेतील झाडांसाठी वापरले जाते. तसेच घातक कचरा वेगळा गोळा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमात वर्गातील एकूण ४५ विद्यार्थिनी सक्रिय सहभाग घेत असून त्यांनी स्वच्छतेची जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे. वर्गामध्ये तीन स्वच्छता मॉनिटर अवनी पेंडसे, तन्वी येंधे आणि शैलजा सोनकांबळे यांची नियुक्त करण्यात आली असून, त्या इतर विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन करून कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करत आहेत. या प्रकल्पामुळे विद्यार्थिनींना स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष कृतीतून समजले असून कचरा कमी करण्याची आणि पुनर्वापराची सवय त्यांच्यामध्ये विकसित होत आहे.

मोशी विभागाच्या पर्यवेक्षिका सुनीता गीते यांची प्रेरणा, मुख्याध्यापिका सुरेखा डांगे यांचे मार्गदर्शन तसेच वर्गशिक्षक संतोष अरुण पन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीरित्या राबविला जात आहे. शून्य कचरा प्रकल्पाच्या समन्वयक अर्चना मोरे यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!