शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. शहराच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असून प्रधानमंत्री आवास योजना–शहरी 2.0 (PMAY-U 2.0) अंतर्गत तळेगाव दाभाडे शहरासाठी तब्बल ११४ कोटी रुपयांची विशेष योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेमुळे शहरातील सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार असून तळेगावच्या विकासाला नवी गती मिळणार आहे.
२३ फेब्रुवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीच्या (CSMC) सहाव्या बैठकीत देशभरातील २.८८ लाख अतिरिक्त घरांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे ५२८ घरकुलांचा समावेश असून या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता मिळाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या योजनेमुळे केवळ घरकुल उपलब्ध होणार नाही, तर शहराच्या पायाभूत सुविधांनाही मोठी चालना मिळणार आहे.
निवडणुकीच्या काळात दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरवत आमदार सुनील शेळके यांनी अल्पावधीतच तळेगावकरांसाठी हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा केला आहे. त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे तळेगाव शहराच्या विकासात नवा अध्याय लिहिला जात असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. पहिल्याच टप्प्यात नगराध्यक्ष व नगरसेवकांसाठीही ही मोठी विकासाची भेट ठरली असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमान उंचावण्यासाठी आमदार सुनील शेळके यांचे योगदान अधिक ठळकपणे अधोरेखित झाले आहे. केंद्र शासनाचे त्याचबरोबर राज्य शासनाने देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त केले.
आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश मिळत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजना-शहरी 2.0 (PMAY-U 2.0) अंतर्गत मंजूर झालेल्या या योजनेत तळेगाव दाभाडे शहरातील सुमारे ५२८ घरकुलांचा समावेश असून सुमारे ११४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
शासन निकषांनुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचा सर्व्हे करून दि. २६/१२/२०२५ रोजी सदर प्रस्ताव सादर करण्यात आला होता. शहरातील साधारण २५०० नागरिकांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी सद्यस्थितीत ५६८ लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे. सुमारे ४२० चौ. फुटांचे हे घर असणार असून हक्काचे घर उपलब्ध होणार असल्याने नागरिकांमधून समाधान आणि आनंद व्यक्त केला जात आहे. तळेगावच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी ही योजना विकासाचा नवा टप्पा ठरणार असून शहराच्या भविष्यातील प्रगतीला यामुळे भक्कम दिशा मिळणार आहे.


