शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिली आहे. अलीकडे समाजमाध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचे भासवणारी खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसेच महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्रे, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे. परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतेही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
तथापि, बनावट जाहिराती व संदेशांच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या तक्रारी प्रशासन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेच्या प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊनच तिची खातरजमा करावी, असे आवाहन प्रशासन विभागाचे सहआयुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे.


