शबनम न्यूज | प्रतिनिधी
औंध-पुणे दिनांक २३/०२ /२०२६ रयत शिक्षण संस्थेच्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम सांस्कृतिक विभाग, इतिहास विभाग आणि रॅशनल थिंकिंग सेल यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. या एकपात्री प्रयोगाचे सादरकर्ते होते मा.नटश्रेष्ठ कुमार आहेर. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभंजन चव्हाण हे होते.
मा.नटश्रेष्ठ कुमार आहेर यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग मोठ्या उत्साहात सादर केला. या प्रयोगाने उपस्थित विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव, स्वच्छतेचे महत्त्व आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश प्रभावीपणे दिला.या एकपात्री सादरीकरणात मा. कुमार आहेर यांनी संत गाडगे महाराजांच्या साध्या वेशभूषेत त्यांच्या आयुष्यातील विविध प्रसंग जिवंत केले. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधन, स्वच्छतेचा आग्रह, जातिभेदाविरोधातील भूमिका आणि शिक्षणाविषयीचे विचार प्रभावीपणे मांडले गेले. कलाकाराच्या दमदार आवाजामुळे आणि भावपूर्ण अभिनयामुळे सभागृहातील विद्यार्थी भारावून गेले होते. हा एकपात्री प्रयोग केवळ मनोरंजन न राहता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरला.
यावेळी डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. संदीप नन्नावरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ.रेश्मा दिवेकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली सुपेकर यांनी केले. यावेळी ९७ विद्यार्थी उपस्थित होते.


