पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी हातभट्टी दारूविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी गुन्हा क्रमांक १३०/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ख) (च) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २३/०२/२०२६ रोजी दुपारी २.२५ वाजण्याच्या सुमारास, मौजे घाडगे वस्ती, कुरुळी, ता. खेड, जि. पुणे येथील ओढ्याच्या कडेला झाडाझुडपांमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला.
ही कारवाई सायंकाळी ६.४५ वाजता पूर्ण करण्यात आली.
छाप्यादरम्यान आरोपी रोहीत राठोड (रा. फलके वस्ती, मोई, ता. खेड, जि. पुणे) हा ५,५०० लिटर कच्चे रसायन (अंदाजे २,७५,००० रुपये) व १०५ लिटर तयार गावठी दारू (अंदाजे १०,५०० रुपये) बाळगताना आढळून आला. मात्र, छाप्याची चाहूल लागताच आरोपी झाडाझुडपांचा आड घेत फरार झाला. सध्या आरोपी अटक नाही.
सदर ठिकाणी मिळून आलेले सर्व साहित्य पंचासमक्ष जागीच नष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणाची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र परमेश्वर खेडकर (ब.नं. २८००) यांनी दिली असून पुढील तपास सपोफौ सुपेकर करत आहेत.
पोलिसांनी दारूविरोधी कारवाया पुढेही तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.


