शबनम न्यूज | प्रतिनिधी
हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जांबे गावाजवळील रसिकवाडी परिसरात बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याप्रकरणी एका शेतकऱ्यास अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०४/२०२६ नुसार एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८ (ब), १८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०५ वाजण्याच्या सुमारास मुळशी तालुक्यातील जांबे गावातील रसिकवाडी येथील शेत गट क्रमांक ४० मध्ये ही कारवाई करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हंबीरराव जगताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला.
या छाप्यात आरोपी संपत बाबुराव दर्शिले (वय ७७, व्यवसाय शेती, रा. रसिकवाडी जांबे, ता. मुळशी, जि. पुणे) याच्या मालकीच्या शेतात अंदाजे १६.६२० ग्रॅम वजनाची अफूची झाडे आढळून आली.
सदर झाडांची किंमत सुमारे २५,१७,५०० रुपये इतकी असून कोणतीही शासकीय परवानगी नसताना अफूची लागवड केल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी अफूची झाडे जप्त करून आरोपीस अटक केली असून पुढील तपास सपोनि चौधरी करीत आहेत.


