शबनम न्यूज | प्रतिनिधी
नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन ॲप्लीकेशन अँड रिसर्च (निडर २०२५-२६) या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पीसीसीओई महाविद्यालयाने “आपत्ती व्यवस्थापन” विभागात सादर केलेला ड्रोन प्रकल्प सर्व तांत्रिक अटी, शर्ती पूर्ण करून रौप्यपदक आणि चार लाख रुपयांच्या बक्षीसाचा मानकरी ठरला. आपत्ती व्यवस्थापनात आणीबाणीच्या प्रसंगी उद्भवणाऱ्या परिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी पीसीसीओईने पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून विकसित केलेले हे ड्रोन उपयोगी ठरेल असे प्रतिपादन पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी केले.
नवी दिल्ली, ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठ येथे आयोजित केलेल्या नॅशनल इनोव्हेशन चॅलेंज फॉर ड्रोन अँप्लिकेशन अँड रिसर्च (NIDAR) या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) रौप्य पदक विजेत्या “टीम मॅव्हरिक इंडिया” आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, डीन आर अँड डी डॉ. नरेंद्र देवरे, विभाग प्रमुख डॉ. पद्माकर देशमुख, प्रा. अमित पंचवाडकर, चंदन इंगोले, प्रा. अजय गाडे आणि टीम मधील यशस्वी विद्यार्थी उपस्थित होते.
या स्पर्धेत भारतातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयामधील ३५१ विद्यार्थी संघांनी सहभाग घेतला होता.
पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी सांगितले कि, पीसीसीओई टीम मॅव्हरिक इंडिया मधील ऋतिक लीपाटे आणि निमिषा खलाबे यांच्या नेतृत्वाखालील टीमने आपत्ती व्यवस्थापनात आणीबाणीच्या प्रसंगी उद्भवणाऱ्या परिस्थितीत बचाव कार्य करण्यासाठी पूर्णपणे स्वदेशी, फील्ड – डिप्लोएबल, स्वायत्त हवाई प्रणाली वापरून सादर केलेला ड्रोन स्पर्धेत आकर्षण ठरला. या ड्रोन मध्ये आपत्तीग्रस्त काळात उद्भवलेल्या परिस्थितीवर पाळत ठेवणे आणि वाचलेल्यांना शोधण्यासाठी, ३-मीटर व्हीटीओएल आणि अचूक वैद्यकीय किट वितरणासाठी हेक्साकॉप्टर यांचा समावेश आहे. ही प्रणाली थर्मल इमेजिंग, ऑनबोर्ड मशीन लर्निंग, रिअल टाइम जीपीएस समन्वय आणि थेट व्हिडिओ स्ट्रीमिंग एकत्रित करते, त्यामुळे अचूकपणे नियोजन करून निर्णय घेता येतात. यामुळे जीवित, वित्तीय हानी टाळता येईल आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल.
या प्रकल्प प्रणालीसाठी महाराष्ट्र फास्टनर्स प्रा. लि., डसॉल्ट सिस्टम्स, एएनएसवायएस, कार्बोनेक्स्ट इंडिया प्रा. लि., डीआरके स्टोअर, एम पॉवर लिथियम, एमएडी कंपोनेंट्स, ट्रेड सिंडिकेट, रॅपिड प्रिंट्स आणि विराग इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपन्यांनी सहकार्य केले.


