शबनम न्यूज | प्रतिनिधी
भोसरी एमआयडीसी औद्योगिक परिसरात आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. औद्योगिक क्षेत्र शिवमय झाले असून उद्योजक, कामगार व महिला भगिनी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले. कार्यक्रमाचे आयोजन इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या पुढाकाराने करण्यात आले. तसेच दुर्गा ब्रिगेड पक्षाच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी झाली.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व आरती करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी शिवरायांच्या विचारांचा जागर करत औद्योगिक क्षेत्रात एकता, शिस्त आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.
यावेळी पारंपरिक शस्त्रांची सलामी देत महाराजांना मानवंदना अर्पण करण्यात आली. अवंतिका भोर यांनी शौर्यपूर्ण प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. कार्यक्रमानंतर सर्वांना पेढे वाटून शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या भव्य उत्सवामुळे भोसरी एमआयडीसी परिसरात उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. शिवरायांच्या आदर्शांवर चालत उद्योग क्षेत्रात प्रगती साधण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी व्यक्त केला.


