शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक कैलास बारणे यांना महापालिका सभागृहात ‘स्वीकृत नगरसेवक’ म्हणून संधी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना निवेदन देत ही मागणी केली.
योगिता बारणे यांनी निवेदनात नमूद केले की, त्यांच्या नगरसेवक पदाच्या प्रवासात कैलास (बाबा) बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलमधून वॉर्ड क्र. क–२३, थेरगाव गावठाण येथून उमेदवारीची संधी दिली. निवडणुकीदरम्यान त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने संपूर्ण पॅनेलचे नेतृत्व करत पक्ष संघटना अधिक बळकट केली.
कैलास बारणे यांचा समाजकारणातील दीर्घ अनुभव, सर्वसामान्य नागरिकांशी असलेला जवळचा संपर्क आणि शहर विकासासाठी असलेली तळमळ लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा अधिकृत संधी मिळावी, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे, यश दत्ता काका साने, नगरसेविका मायाताई बारणे यांच्या वतीने नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी भाऊसाहेब भोईर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, माजी नगरसेवक कैलास बाबा बारणे यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका सभागृहात संधी द्यावी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कैलास बारणे यांनी प्रामाणिकपणे व प्रचंड मेहनतीने राष्ट्रवादी पक्षाचे काम केले आहे. पक्ष संघटना म्हणून त्यांनी उत्तमरीत्या कामगिरी केली आहे तसेच अनेक वर्षापासूनचा त्यांचा सामाजिक व राजकीय कामाचा अनुभव पाहता तसेच मागील 2017 च्या निवडणुकीत यश मिळवत 2017 मधील त्यांचा नगरसेवक पदावर काम करण्याचा अनुभव पाहता त्यांना परत एकदा महापालिका सभागृहात पाठवून नगरसेवक पदावर काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे


