शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे गुरव येथील किलबिल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य आणि दिव्य मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागाने सारा परिसर शिवमय झाला.
या मिरवणुकीत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकवर्ग मोठ्या संख्येने उत्साहाने सहभागी झाले. घोड्यावर विराजमान छत्रपती शिवाजी महाराज आणि माता जिजाऊ यांचे साकारलेले रूप हे मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले.
विद्यार्थिनींनी लेझीम आणि फुगडीच्या तालावर सादरीकरण करत मिरवणुकीची शोभा वाढवली. ढोल-ताशांच्या गजरात आणि “जय भवानी, जय शिवाजी”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
कार्यक्रमास शाळेचे संस्थापक नासिर सौदागर सर, राहील सौदागर सर, मुख्याध्यापक साबळे सर, शेख सर, श्रीमती शेख मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नगरसेविका शकुंतलाताई धराडे, रवीनाताई अंघोळकर, सामाजिक कार्यकर्ते पिंटूभाऊ जवळकर, माजी नगरसेवक राजूभाऊ लोखंडे, माजी नगरसेविका चंदाताई लोखंडे, मुलाणीसाहेब यांसह विविध मान्यवरांनीही हजेरी लावली.
हजारोंच्या संख्येने निघालेल्या या मिरवणुकीचे नागरिकांनी जागोजागी स्वागत केले. शेवटी तुळजाभवानी मंदिर चौक येथे मिरवणुकीचा सांगता समारंभ उत्साहात पार पडला.
शिस्तबद्ध आयोजन, सांस्कृतिक सादरीकरणे आणि शिवभक्तीच्या वातावरणात पार पडलेला हा सोहळा पिंपळेगुरव परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला.


