spot_img
spot_img
spot_img

पिंपरी-चिंचवड महापालिकेस पूर्णवेळ आयुक्त नेमावा – रविराज काळे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेला तातडीने पूर्णवेळ आयुक्त नेमावा, अशी मागणी रविराज काळे, शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक 2026 पार पडून नवीन महापौरांची निवड झाली असली तरी, प्रशासनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले आयुक्तपद मागील चार महिन्यांपासून प्रभारी स्वरूपात आहे. यामुळे शहरातील विकासकामे आणि दैनंदिन नागरी सेवा प्रभावित होत असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.

महापालिका आयुक्तपदावरून शेखर सिंह यांची बदली करण्यात आली. त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी सोपविल्यानंतर ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला. मात्र, सरकारकडून अद्याप कायमस्वरूपी आयुक्त नेमणुकीचा निर्णय न झाल्याने प्रशासनात संभ्रमाचे वातावरण आहे.

विकासकामांवर परिणाम

रविराज काळे यांनी सांगितले की, शहरात अनेक महत्त्वाच्या नागरी समस्या प्रलंबित आहेत. अनियमित पाणीपुरवठा, कचरा संकलन व प्रक्रिया व्यवस्थेतील त्रुटी, अपूर्ण रस्ते व पूल, पायाभूत सुविधा प्रकल्प तसेच निविदा व अर्थसंकल्पासंदर्भातील निर्णयांमध्ये विलंब होत आहे.

प्रभारी आयुक्तांकडे एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या असल्याने नागरिकांना महापालिकेत त्यांची भेट होत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. प्रशासकीय राजवट संपल्यानंतर शहराच्या विकासाला वेग मिळेल, अशी अपेक्षा होती; मात्र पूर्णवेळ आयुक्त नसल्याने प्रशासनाला ठोस दिशा मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्रीांकडे लेखी मागणी

पिंपरी-चिंचवड शहरासाठी तातडीने कायमस्वरूपी आयुक्त नेमून नागरिकांना दिलासा द्यावा आणि या संदर्भातील कार्यवाहीबाबत लेखी उत्तर द्यावे, अशी मागणी रविराज काळे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!