spot_img
spot_img
spot_img

“ईव्हीएम हॅकच्या नावाखाली लाखो रुपये उकळले” – आमदार सुनील शेळके यांचा भाजपवर गंभीर आरोप

मावळ प्रतिनिधी :

मावळ तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत १५ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी च्या वतीने कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर नाव न घेता गंभीर आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापवले.

“ईव्हीएम मशीन हॅक करून विजय मिळवून देतो” असे आमिष दाखवत काही भाजप नेत्यांनी उमेदवारांकडून तब्बल २५ ते ३५ लाख रुपये उकळल्याचा खळबळजनक आरोप शेळके यांनी केला. या प्रकरणाची थेट मुख्यमंत्र्यांकडून चौकशी व्हावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे तालुक्यातील राजकारणात नव्या वादळाची चिन्हे दिसू लागली आहेत.

शेळके यांनी स्पष्ट शब्दांत आव्हान देत म्हटले, “कोणीही माझ्यामुळे मोठे झाले असे वाटत असेल, तर २०२९ मध्ये माझ्या विरोधात उभे राहा. जनता काय निर्णय देते ते पाहू.” आपल्या कार्यपद्धतीवर आणि जनतेच्या विश्वासावर आपला पूर्ण भर असल्याचे त्यांनी यावेळी ठामपणे अधोरेखित केले.

नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी जनतेच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा आणि वैयक्तिक कार्यक्रमांपेक्षा सार्वजनिक कामांना प्राधान्य देण्याचा संदेश दिला. दर आठवड्याला होणाऱ्या जनता दरबारात उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे सांगत, “पक्षाचे काम हे घरचे काम नसून जनतेची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
येणाऱ्या २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत मावळचा आमदार दीड लाख मताधिक्याने विजयी होईल आणि तो राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या मेळाव्यास माजी मंत्री मदन बाफना , माजी अध्यक्ष बबनराव भेगडे , जिल्हाध्यक्ष विठ्ठल शिंदे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. विशेष म्हणजे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला.

निवडणुकीतील भव्य यशानंतरही जल्लोष टाळून कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सभेमुळे मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारल्याचे स्पष्टपणे दिसून आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!