spot_img
spot_img
spot_img

भोसरी एमआयडीसीतील वीजखंडितीने उद्योग ठप्प; कोट्यवधींचे नुकसान – अभय भोर यांचा घणाघात

शबनम न्यूज | प्रतिनिधी

भोसरी एमआयडीसीच्या टी-ब्लॉक परिसरात आज सकाळपासून वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे हजारो उद्योगांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा उद्योगांवर गंभीर परिणाम झाला असून अनेक कंपन्यांना कामगारांना काम नसताना बसून पगार द्यावा लागत आहे. उत्पादन बंद पडल्याने उद्योगांना कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

मार्च अखेर जवळ आल्याने उद्योगांमध्ये आधीच कामाचा प्रचंड ताण असताना ही वीजखंडिती म्हणजे दुहेरी संकट ठरले आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे वीजपुरवठा नेमका कधी सुरू होणार याबाबत कोणतीही ठोस माहिती देण्यात आलेली नाही, त्यामुळे उद्योगांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.

या पार्श्वभूमीवर इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी Maharashtra State Electricity Distribution Company Limited (महावितरण) च्या कारभारावर कडाडून टीका केली आहे. उद्योजकांकडून विजबिलासाठी कोणतीही मुदत न देता त्वरित वीजपुरवठा खंडित केला जातो; मात्र हजारो कंपन्या दिवसभर बंद राहून प्रचंड नुकसान सहन करत असताना त्याची जबाबदारी घेण्यास महावितरण तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला.

अभय भोर यांच्या ठाम मागण्या :

  • तात्काळ दुरुस्ती करून अखंड वीजपुरवठा सुरू करावा
  • बॅकअप व पर्यायी व्यवस्थेची कायमस्वरूपी योजना जाहीर करावी
  • आज झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई उद्योगांना द्यावी
  • देखभाल व आपत्कालीन प्रतिसादासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती करावी

उद्योग हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा असून, उच्च दराने वीजबिल भरूनही सातत्यपूर्ण वीजपुरवठा न मिळणे हे अत्यंत संतापजनक असल्याचे भोर यांनी नमूद केले. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उद्योगांना दिलासा द्यावा; अन्यथा उद्योगांच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!