spot_img
spot_img
spot_img

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी धडक कारवाई

४.२७ कोटींचा एमडी जप्त; अंमली पदार्थांची आंतरराज्यीय टोळी उध्वस्त, ६ आरोपी अटकेत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

खराडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या पथकाने अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत राजस्थानमध्ये सक्रिय असलेली आंतरराज्यीय एमडी (मेफॅड्रॉन) तस्करी करणारी टोळी उध्वस्त केली आहे.

या कारवाईत एकूण १ किलो ९६० ग्रॅम एमडी जप्त करण्यात आला असून रोख रक्कम, वाहन, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास खराडी परिसरातील ईऑन फेज-२ मागील गेटजवळ सार्वजनिक रस्त्यावर दोन इसम एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून २७ ग्रॅम एमडी व तत्सम साहित्य बाळगताना आढळून आले. त्यांच्याकडून सुमारे १२ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी खराडी पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासादरम्यान हे दोन्ही आरोपी मूळचे राजस्थान राज्यातील जोधपूर जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. ते मागील एक वर्षापासून राजस्थानमधील संपर्कातून पुणे परिसरात एमडीचा व्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. पोलिस कोठडीत कौशल्यपूर्ण तपास करत असताना एमडीचा पुरवठा करणाऱ्या मुख्य आरोपींची माहिती मिळाल्यानंतर तपासाची दिशा राजस्थानकडे वळवण्यात आली.

दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी वाघोली परिसरात सापळा रचून एमडी पुरवठा करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १५१ ग्रॅम एमडी, मोबाईल फोन असा सुमारे ३० लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात आणखी आरोपींचा सहभाग उघडकीस आला. हडपसर, मुंढवा व मांजरी परिसरातून अनुक्रमे एमडी विक्री करणारे आरोपी पकडण्यात आले.

एका आरोपीकडून फॉर्च्युनर वाहनासह ३९८ ग्रॅम एमडी, मोबाईल फोन असा एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पुढील तपासासाठी पाच विशेष पथके राजस्थान राज्यात रवाना करण्यात आली. तेथे आरोपींच्या घरांची झडती घेत मुख्य वितरकास अटक करण्यात आली.

त्याच्याकडून तब्बल १ किलो ३८४ ग्रॅम एमडी, सुमारे २ कोटी ७६ लाख रुपयांचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच फरार आरोपीसही राजस्थानमधून ताब्यात घेण्यात यश आले.

या संपूर्ण कारवाईत अटक आरोपींकडून एकूण १ किलो ९६० ग्रॅम एमडी, सुमारे ३ कोटी ९२ लाख रुपयांचा अंमली पदार्थ, तसेच मोबाईल फोन, फॉर्च्युनर वाहन व रोख रक्कम असा मिळून एकूण ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलीस स्टेशन व अंमली पदार्थविरोधी पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आली असून सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पुणे पोलिसांच्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठे यश मिळाल्याचे बोलले जात आहे

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!