spot_img
spot_img
spot_img

‘शिवशंभो गर्जना’ कार्यक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वाचा दिमाखदार शुभारंभ

शबनम न्यूज | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज की जय… जय भवानी जय शिवाजी असा आसमंत भेदणारा जयघोष आणि अंगावर शहारे आणणारा वाद्यांचा निनाद, अशा वातावरणाने निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प परिसर अक्षरशः शिवमय झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ चे दिमाखदार उद्घाटन ‘शिवशंभो गर्जना’ कार्यक्रमाने झाले. सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतून घुमणारा शिवरायांचा देदीप्यमान इतिहास आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा यानिमित्ताने रसिकांसमोर उलगडला गेला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १५ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रबोधन पर्वाची सुरुवात १५ फेब्रुवारी रोजी निगडी येथील भक्ती-शक्ती समूह शिल्प उद्यान येथे अंबेजोगाई येथील सुप्रसिद्ध कलाकार अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांच्या ‘शिवशंभो गर्जना’ या कार्यक्रमाने झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी उपमहापौर तथा नगरसदस्या शैलजा मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नगरसदस्य उत्तम केंदळे, माजी नगरसदस्य मारुती भापकर तसेच उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते जीवन बोराडे,धनाजी येळकर पाटील,सागर तापकीर,आबा ढवळे,अभिषेक म्हसे, संतोष कवडे, ओमकार पवळे, शाहीर प्रकाश ढवळे, विशाल बोंगाळे,स्वप्नील शिंदे,रोहिदास शिवणेकर, श्रीमंत जगताप,सागर लष्करे,नाना काळभोर,राजेंद्र काटे,संग्राम मगर आदी यावेळी उपस्थित होते.

‘शिवशंभो गर्जना’ कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध

भक्ती-शक्ती येथे सादर झालेल्या अंबेजोगाई येथील सुप्रसिद्ध कलाकार अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांच्या ‘शिवशंभो गर्जना’ या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पहाडी आवाजातील पोवाडा, अस्सल मातीतील शाहिरी, भक्तीरसाने न्हालेली गवळण आणि समाजप्रबोधन करणारे भारूड अशा विविध कलाविष्कारांनी शिवकाळातील वातावरण जिवंत केले. यानिमित्ताने वाद्यांच्या निनादात आणि तुताऱ्यांच्या ललकारीत शिवरायांच्या पराक्रमाची गाथा पुन्हा एकदा जनमानसात रुजली. वाद्यांच्या निनादात रंगलेला हा सोहळा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम न ठरता, शिवरायांच्या विचारांचे अमृत सिंचन करणारे एक भव्य व्यासपीठ ठरला असून या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

उद्यापासून १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान सादर होणार ‘शिवगर्जना’ भव्य महानाट्य…

‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत निगडी येथील नियोजित महापौर निवास परिसरात १७, १८ व १९ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. माननीय राष्ट्रपती महोदयांसमोर सादर झालेल्या या भव्य महानाट्य प्रयोगामध्ये सुमारे २५० हून अधिक कलाकारांचा सहभाग असून घोडे, उंट तसेच आकर्षक नेपथ्य, नेत्रदीपक आतिषबाजी, प्रकाशयोजना व ध्वनीसंयोजनाच्या माध्यमातून शिवचरित्रातील महत्त्वपूर्ण प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात येणार आहेत.

महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते उद्या १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजता या महानाट्याचा शुभारंभ होणार आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!