शबनम न्यूज | प्रतिनिधी
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा होणारा बलिदान मास यावेळी १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या वतीने पाळण्यात येणार आहे. तसेच, शिव-शंभू विचारांची पिढी घडवण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातील नवनिर्वाचित नगरसेवक आणि आजी-माजी पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बलिदान मास जनजागृतीबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष व आमदार महेश लांडगे, महापौर रवि लांडगे यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. बैठकीत कार्यक्रमांचे नियोजन, जनजागृती मोहिमेची रूपरेषा आणि युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम याबाबत सविस्तर चर्चा झाली.
फाल्गुन अमावस्येला (इ.स. १६८९) संभाजी महाराजांनी मुघल बादशाह औरंगजेबाच्या कैदेत अमानुष छळ सहन करत स्वराज्य आणि धर्मासाठी सर्वोच्च बलिदान दिले. संगमेश्वर येथील सरदेसाईंच्या वाड्यात पकडल्यापासून ते भिमा-भामा-इंद्रायणीच्या तीरावर मृत्यूला सामोरे जाण्यापर्यंत त्यांनी दाखवलेले धैर्य व शौर्य आजही प्रेरणादायी ठरते. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते. त्यांनी मुघलांच्या आक्रमणांना प्रतिकार केला आणि छळ सहन करूनही स्वराज्य व धर्माशी तडजोड केली नाही. या त्यागामुळे त्यांना “धर्मवीर” म्हणून गौरवण्यात आले आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, युवकांसाठी व्याख्यानमाला, इतिहास स्पर्धा व “धर्मवीर” आदर्शांच्या आधारे त्याग, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश प्रसारित केला जातो. सोशल मीडियावर सत्य इतिहास व सकारात्मक संदेश प्रसारित करण्यावर भर देण्यात येणार आहे. बलिदान मास केवळ ऐतिहासिक स्मृती नसून तरुण पिढीला शौर्य, त्याग व कर्तव्यपरायणतेचा मंत्र देणारा महत्त्वाचा काळ आहे. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या या उपक्रमातून समाजात ऐक्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जाणीव अधिक दृढ होईल, असा विश्वास आहे.
बलिदान मासाचे उद्दिष्ट…
इतिहासाची जाणीव व राष्ट्रनिष्ठा दृढ करणे. युवकांना शौर्य, त्याग आणि कर्तव्यपरायणतेची प्रेरणा देणे. सामाजिक ऐक्य व समाजोपयोगी कार्यांना चालना देणे, असा उद्देश आहे. तसेच, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये अभिवादन, व्याख्यानमाला व इतिहासपर कार्यक्रम, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण व अन्नदान, विद्यार्थ्यांसाठी निबंध/भाषण स्पर्धा, माहितीपर प्रदर्शने व जनजागृती मोहिमा, व्यक्तिगत आणि सामाजिक आचरण याचा समावेश आहे. दररोज महाराजांना अभिवादन व इतिहास वाचन, व्यसनमुक्त जीवनशैली, शिस्तबद्ध व सुसंस्कृत वर्तन, धर्म आणि राष्ट्राचा आदर राखणे यावर विशेष भर दिला जातो. समाजोपयोगी उपक्रमात सहभाग, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, स्थानिक ऐतिहासिक स्थळांची जतन व स्वच्छता या कामांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, त्याग आणि धर्मनिष्ठेच्या स्मृतीला आपण साजरे करून, युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि समाजोपयोगी भावनेची जाणीव निर्माण करू. बलिदान मास केवळ ऐतिहासिक स्मृती नसून, प्रत्येक मराठी माणसासाठी प्रेरणास्त्रोत आहे. बलिदान मास केवळ ऐतिहासिक स्मृती नाही, तर तरुण पिढीला शौर्य, त्याग व कर्तव्यपरायणतेचा मंत्र देणारा काळ आहे. हिंदुभूषण स्मारक ट्रस्टच्या या उपक्रमातून समाजात ऐक्य, संस्कार आणि राष्ट्रभक्तीची जाणीव अधिक दृढ होईल.यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


