शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी आज यशवंतराव चव्हाण स्मृती पदव्युत्तर संस्था आणि रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सर्वंकष पाहणी केली.
महापालिका क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वपूर्ण रुग्णालयांपैकी एक असलेल्या या संस्थेत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या उपचारप्रक्रिया, सुविधा, मनुष्यबळ आणि रुग्णालयातील एकूण व्यवस्थेचा महापौरांनी प्रत्यक्ष आढावा घेतला.

महापौरांनी आपत्कालीन विभाग, आयसीयू, जनरल आणि स्पेशालिटी वार्ड, शस्त्रक्रिया विभाग, प्रयोगशाळा, रेडिओलॉजी, फार्मसी, नोंदणी कक्ष तसेच वैद्यकीय शिक्षणाशी निगडित विभागांना भेट देऊन संबंधित डॉक्टर व अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. रुग्णालयातील दैनंदिन कामकाज, उपचारांची गती, उपलब्ध उपकरणांची स्थिती, विद्यार्थी–डॉक्टर प्रशिक्षण प्रक्रिया आणि नागरिकांना मिळणाऱ्या सेवा यासंबंधी सविस्तर माहिती महापौरांना देण्यात आली.
यावेळी महापौरांनी डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजातील आव्हाने, गरजा, उपलब्ध संसाधने आणि रुग्णसेवांबाबत त्यांचे अनुभव जाणून घेतले.
महापौरांनी साधला रुग्णांशी थेट संवाद
महापौरांच्या भेटीदरम्यान रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यावर विशेष भर देण्यात आला. महापौर रवि लांडगे यांनी वार्डांमध्ये जाऊन रुग्णांच्या उपचारप्रक्रियेबद्दल, डॉक्टर व परिचारिकांकडून मिळणाऱ्या सेवांबद्दल, स्वच्छता, औषधोपचार तसेच रुग्णालयातील एकूण वातावरणाबद्दल त्यांची मते जाणून घेतली. अनेक रुग्णांनी वेळेत मिळणारे उपचार, कर्मचाऱ्यांचा सहकार्यभाव आणि आवश्यक सुविधांची उपलब्धता याबाबत समाधान व्यक्त केले, तर काहींनी सुधारणा आवश्यक असलेल्या बाबीही स्पष्टपणे मांडल्या.
महापौरांच्या या पाहणी दौऱ्यादरम्यान आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, नोडल ऑफिसर डॉ. छाया शिंदे तसेच विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.
वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी समर्पणाने काम करत असून नागरिकांना योग्य व तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. नागरिकांना अत्युत्तम, वेगवान आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देणे हे आमचे प्राधान्य आहे. सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि सेवांची गुणवत्ता सातत्याने उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महापालिका


