spot_img
spot_img
spot_img

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही भरता येणार झोपडपट्टी सेवाकर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागामार्फत झोपडपट्टी सेवाकर वसुलीची मोहीम सुरू असून, नागरिकांच्या सोयीसाठी विभागाचे कार्यालय साप्ताहिक तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. सेवाकर भरणा सुलभ व्हावा आणि नागरिकांची गैरसोय टळावी यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तरी झोपडपट्टीवासीयांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपला सेवाकर तात्काळ भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त अण्णा बोदडे यांच्या अधिपत्याखाली करदात्यांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने झोपडपट्टी सेवाकर भरण्याची सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षातील झोपडपट्टी सेवाकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडून विशेष नियोजन करण्यात आले असून, नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेवाकर बिलाच्या खालच्या उजव्या बाजूस देण्यात आलेल्या क्यूआर कोडद्वारे नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन स्वरूपात सेवाकर भरता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार असून डिजिटल पद्धतीने कर भरण्यास चालना मिळणार आहे.

झोपडपट्टीवासीयांना कर भरण्यासाठी अधिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. डिजिटल माध्यमातून क्यूआर कोडद्वारे घरबसल्या सेवाकर भरण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांचा वेळ व श्रम वाचणार आहेत. तरी ज्यांना ऑनलाईन पद्धतीने कर भरणे शक्य नाही अशा करदात्यांसाठी साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन वेळेत सेवाकर भरून शहराच्या विकासात आपला सहभाग नोंदवावा.

– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

चालू आर्थिक वर्षातील सेवाकर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विभागाकडून नियोजनबद्ध मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालय कार्यरत ठेवण्यात येणार आहे. याशिवाय सेवाकर बिलावरील क्यूआर कोडद्वारे ऑनलाईन भरण्याची सुविधा उपलब्ध असून नागरिकांनी थकीत सेवाकर तात्काळ भरावा.

– अण्णा बोदडे, उप आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!