शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ मधील चिखली परिसरात नागरिकांना कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. याबाबत नगरसेवक यश दत्ता काका साने यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे अधिकृत निवेदनाद्वारे तक्रार नोंदवली आहे.
साने यांनी सांगितले की, संपूर्ण परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणी येत असून काही भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित पाईपलाईनची तातडीने तपासणी करून गळती, तुटलेले जोड किंवा इतर तांत्रिक त्रुटी शोधून दुरुस्त कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच, पाण्याच्या गुणवत्तेची सखोल तपासणी करून आरोग्यदायी व स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी ठाम मागणी यश साने यांनी केली आहे. दूषित पाणीपुरवठा त्वरित थांबवून नागरिकांना नियमित व योग्य दाबाने पाणी मिळावे, यासाठी प्रशासनाने तातडीची कारवाई करावी, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.


