शबनम न्यूज | प्रतिनिधी
थेरगाव येथील रुणावल क्लासिक व मंगलदीप सोसायटीसमोरील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात रॉ मटेरियल, मुरूम, दगड व कचऱ्याचे डोंगर साठवून रात्रीच्या वेळी डम्पिंग केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे आजूबाजूच्या सोसायट्यांतील नागरिकांना विशेषतः रात्री मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मात्र संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे.
सदर बाब प्रभाग क्र. २३ चे नगरसेवक अभिषेक बारणे, तानाजी बारणे व नगरसेविका मनीषा पवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तात्काळ नगरसेवकांनी ग क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त किशोर ननावरे, आरोग्य विभाग व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसह परिसराची पाहणी केली. संबंधित डम्पिंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सोनाली गाडे व संदीप गाडे, सनी बारणे उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात ‘स्वच्छ भारत अभियान’ प्रभावीपणे राबवले जात असल्याचे सांगितले जाते. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे अथवा घाण केल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद असताना, मोकळ्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात कचरा साठवला जात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिसर स्वच्छ करावा व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.



