शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक पार पडली. प्रशासकीय निर्णयांसोबतच या बैठकीत एका वेगळ्याच आणि चर्चेचा विषय ठरलेल्या ‘किवळे पॅटर्न’ची जोरदार चर्चा रंगली.
नुकत्याच पार पडलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेना शिंदे गटाच्या तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले. हे तीनही उमेदवार या निवडणुकीला पहिल्यांदाच सामोरे गेले आणि अनेक वर्षापासून या प्रभागात वर्चस्व असलेल्या मातब्बर लोकप्रतिनिधींचा पराभव केला हा किवळे पॅटर्न महापालिका निवडणुकीच्या निकालापासूनच अनेकांच्या चर्चेचा विषय आहे आणि हाच किवळे पॅटर्न आज महानगरपालिका परिसरात चर्चेचा विषय ठरला, मातब्बर लोकप्रतिनिधींना आसमान दाखविणारा हा किवळे पॅटर्न येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात स्वतःचा वेगळा ठसा उमटविणार असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला धक्का देत प्रभाग क्रमांक १६ मधून शिवसेनेचे निलेश तरस, रेश्मा कातळे आणि ऐश्वर्या तरस यांनी दणदणीत विजय मिळवला होता. या अनपेक्षित विजयामागील रणनीतीमुळे निवडणूक काळात संपूर्ण शहरात ‘किवळे पॅटर्न’ची चर्चा रंगली होती.
याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक १६ मधील नगरसेवकांनी डोक्यावर फेटा परिधान करत त्यावर ‘किवळे पॅटर्न’चे स्टिकर लावून सभागृहात प्रवेश केला. या आगळ्यावेगळ्या आणि लक्षवेधी प्रवेशामुळे सभागृहातील उपस्थित नगरसेवक, पदाधिकारी तसेच नागरिकांचे लक्ष वेधले गेले. सभागृहात काही काळ याच विषयावर उत्सुकता आणि चर्चा सुरू होती.
या वेळी युवा नेते बापू कातळे आणि राजेंद्र तरस यांचीही उपस्थिती होती. ‘किवळे पॅटर्न’ हे केवळ निवडणूक जिंकण्यापुरते मर्यादित नसून, जनतेशी जोडलेले एक प्रभावी प्रतीक बनत असल्याची प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या पहिल्याच बैठकीत महिला नगरसेविकांकडून अशा प्रकारे दिला गेलेला राजकीय संदेश चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून, आगामी स्थानिक राजकारणात ‘किवळे पॅटर्न’ कोणती भूमिका बजावतो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


